सावंतवाडी: ​सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचला आहे. ते आज बुधवारी ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमान वाढले असल्याचे जाणवत आहे.कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजूच्या फळबागांवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच, उन्हाची तीव्रता वाढल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट डोके वर काढू लागले आहे.

​तापमानाची वाढती तीव्रता

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळी असह्य होणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
​आंबा आणि काजू पीक शेवटच्या टप्प्यात आहे. तापमान वाढत असल्याने फळगळ होऊ लागली आहे. दुपारी बागायती मध्ये उन्हाचे चटके सहन करत बागायतदार फळ गोळा करत आहेत.

​पाण्याची पातळी खालावली

​उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि बागांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. अनेक विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी पातळी तळाला गेल्याने टँकर किंवा अन्य पर्यायांचा आधार घ्यावा लागण्याची भिती वाटत आहे.

​बदलते हवामान आणि वाढत्या तापमानामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच फळबागा वाचवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती मदत करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी करत आहेत.