सावंतवाडी: वाढते तापमान आणि महामार्गासाठी होणारी प्रचंड वृक्षतोड या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे ढिम्म झाले आहे. आता गप्प न बसता प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली असून, नजीकच्या काळात जिल्ह्यात ‘चिपको’ सारखे आंदोलन उभे राहू शकते, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिला आहे.
नूतन मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत (वनश्री फाउंडेशन, तिलारी) आणि पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब (रानबांबुळी) यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुमेधा सावंत, सतिश लळीत, संदीप सावंत, सतीश देसाई, वनक्षेत्रपाल सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महामार्गावरील वृक्षारोपणाचा जाब विचारणार
डॉ. परुळेकर यांनी आपल्या भाषणात मुंबई-गोवा महामार्गावरील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. “झाराप ते पत्रादेवी आणि झाराप ते खारेपाटण या दरम्यान हजारो झाडांची कत्तल झाली. ही झाडे पुन्हा लावण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला. तसेच, मोपा विमानतळामुळे सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील जमिनींचे व्यवहार वाढले असून इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सरमळे, कोलझर, सासोली यांसारख्या गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “झाडांना देव-देवतांची नावे देऊन वृक्षतोड थांबवण्याचा नवा प्रयोग आता करावा लागेल,” असेही त्यांनी सुचवले.
सत्कारमूर्ती संजय सावंत यांनी तिलारी पट्ट्यातील जैवविविधतेवर प्रकाश टाकला. “तिलारीमध्ये वाघ, किंग कोब्रा, वनमानव असे दुर्मिळ वैभव आहे. मात्र, रिंग रोड, खाणी आणि क्रशरमुळे हे वैभव धोक्यात आले आहे. मूळ जमीन मालकांनी जमिनी विकल्यानंतर आता परप्रांतीयांसाठी १४० कोटी खर्चून रिंग रोड बांधला जात आहे, ज्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्याला मोठी हानी पोहोचणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या सत्कारमूर्ती भाग्यश्री परब यांनी सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीला २४७ पक्षी प्रजातींची नोंद होती, जी आज ४२८ पर्यंत पोहोचली आहे. हे पक्षी वैभव टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.”
या कार्यक्रमात वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी विचार मांडले तसेच संदीप सावंत, सतिश देसाई,सतिश लळीत,काका भिसे यांच्यासह मान्यवरांनी शक्तीपीठ महामार्ग, पर्यावरण संवर्धन आणि क्रशर-खाणींच्या वाढत्या प्रभावावर आपली मते मांडली. कार्यक्रमाला वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरणवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
