मुंबई: सिंधुदुर्गातील प्रसिद्ध निवती समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पाण्याखालील संग्रहालय साकारत आहे. हे संग्रहालय ज्या ‘आयएनएस गुलदार’ ही नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका गुरुवारी सिंधुदुर्गातील समुद्रात विसावली. आता या समुद्रात विसावलेल्या युद्धनौकेवर संग्रहालय साकारणार असून ही युद्धनौका प्रवाळभिंत तसेच माशांच्या निवासस्थान म्हणून विकसित होणार असल्याने स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटनासाठी पर्यटकांच्या पसंतीस उतरणार आहे. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या युद्धौकेवरील संग्रहालय महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ४६.९१ कोटी तर महाराष्ट्र शासनाने ११२.४६ कोटी इतक्या रकमेस मंजुरी दिली. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई यांच्या माध्यमातून १९ मे रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे २२ मीटर खोलीवर नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आली. या स्थळाची निवड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या सविस्तर वैज्ञानिक अभ्यासानंतर करण्यात आली असून परिसरात नैसर्गिक प्रवाळभित्ती नसल्याचे प्रमाणित करण्यात आल्यानंतरच ही युद्धनौका सागरतळाशी स्थापित

करण्यात आली. त्याआधीनौकेची पर्यावरणीय स्वच्छता करण्यात आली असून एक्स-आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभिंत्ती म्हणून कार्य करणार असून त्यामुळे समुद्री जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे. या प्रकल्पाकडे साण्यासाठी येथील बंदरावरून स्पीडबोटद्वारे निवती रॉक येथे पोहोणे व तेथील बार्जवर उतरुन पाणबुडी किंवा स्कूबाव्दारे युद्ध नौकेमधील प्रवाळ, मत्स्य पाहणी करता येणार आहे. फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत विकसित करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी दिली.

लवकरच बुकिंग करता येणार

या पाण्याखालील संग्रहालयाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळाचा आनंद घेण्यासाठी व्रेक डायव्हिंग व डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (१२ मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (१८ मीटरपर्यंत), ॲडव्हान्स डायव्हिंग अनुभव (३० मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि पर्यटक सुविधांबाबतची माहिती लवकरच एमटीडीसीच्या अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येणार आहे.

३९ वर्षांच्या सेवेनंतर युद्धनौका विसावली

एक्स-आयएनएस गुलदार ही भारतीय नौदलातील “मगर” वर्गातील लँडिंग शिप टँक प्रकारातील युद्धनौका असून तिने तब्बल ३९ वर्षे राष्ट्रसेवा बजावून १२ जानेवारी रोजी नौदलामधून निवृत्त झाली. ८३.९ मीटर लांबीची ही नौका उभयचर युद्धकारवाई, सैनिक व रसद वाहतूक, किनारी सुरक्षा तसेच विविध नौदल सराव मोहिमांमध्ये कार्यरत होती. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या माध्यमातून दिनांक १९ मे रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे २२ मीटर खोलीवर नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आले आहे.