​सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १२१ किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी कांदळवन विभाग सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गतः कासवांमध्ये पालकत्वाची भावना नसते, परंतु कांदळवन विभाग मात्र या कासवांच्या अंड्यांचे आणि पिल्लांचे आईच्या मायेने जतन करत आहे.

याच जनजागृतीसाठी आज, १० एप्रिल रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच येथे ‘कासव महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ​विणीच्या हंगामात (नोव्हेंबर ते मे) कासवाची मादी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी अंडी घालून पुन्हा समुद्रात निघून जाते. या अंड्यांचे भटके कुत्रे, मुंगूस, घोरपड आणि मानवी हस्तक्षेपापासून संरक्षण करण्यासाठी कांदळवन विभाग आणि स्थानिक ‘कासव मित्र’ अहोरात्र काम करत आहेत.

अंडी उबवणी केंद्रात (हॅचरी) सुरक्षितरीत्या हलवून त्यांचे तापमान नियंत्रित केले जाते. ४५ ते ५५ दिवसांनंतर अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाते. ​या मोहिमेला आता आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड मिळाली आहे. २०२२ मध्ये सात मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले होते, ज्यापैकी ‘बागेश्री’ नावाच्या कासवाने ३५०० किमीचा प्रवास केला आहे.

तसेच २०२५ मध्ये ६४ मादी कासवांना ‘मेटल टॅग’ लावून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ​मालवणचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे, वेंगुर्ला परिमंडळ अधिकारी सुनील सावंत आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली वायंगणी, उभादांडा, शिरोडा वेळागर अशा विविध किनाऱ्यांवर हजारो पिल्लांना जीवनदान देण्यात आले आहे.

वायंगणी येथील कासव मित्र सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी या कामात मोठे योगदान देत आहेत. ​आज दि.१० एप्रिल रोजी होणाऱ्या कासव महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये आणि नागरिकांमध्ये सागरी जीवांच्या संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश मर्गज यांनी दिली आहे.