सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या, सोमवार दि.९ मार्च रोजी वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे (ता. कुडाळ) यांनी यासंदर्भातील हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे.

​सध्याच्या हवामान प्रणालीनुसार, बिहारपासून झारखंड ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. तसेच मन्नारच्या आखातात समुद्रसपाटीपासून ०.९ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या प्रणालींचा प्रभाव प्रामुख्याने कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागावर जाणवणार आहे.

​बंगालच्या उपसागरावरून निर्माण झालेल्या या हवामान बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेकडील घाट क्षेत्रात पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची दाट शक्यता आहे. पाऊस पडताना वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.