सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद आणि १०० पंचायत समिती जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सरासरी ६१.९८ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागातील मतदारांनी आपला कौल देण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी केल्याने मतदानाचा टक्का दुपारनंतर वाढला. आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून आज, ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचा निकाल जाहीर होणार आहे.

​प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ६९.५४ टक्के मतदान झाले, तर वेंगुर्ला तालुक्यात ६९.०३ टक्के मतदानाची नोंद झाली. वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी ५४.७९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ५,६१,१०५ मतदारांपैकी ३,४७,७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १,८०,३२७ पुरुष आणि १,६७,४२२ महिला मतदारांचा समावेश आहे.

​आज सकाळी १० वाजता मतमोजणी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सकाळी १० वाजता एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक पंचायत समितीच्या गणानुसार मतमोजणीसाठी १० ते १४ टेबल लावण्यात आले असून, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे.

तालुका निहाय मतदान:

सावंतवाडीत १,०४,००० मतदारांपैकी ७२,३१९ (६९.५४%), वेंगुर्ल्यात ५८,७८५ पैकी ४०,५७९ (६९.०३%), कुडाळमध्ये १,१६,६३० पैकी ७०,०७७ (६०.०८%), दोडामार्गमध्ये ३८,२४३ पैकी २२,८८१ (५९.८३%), कणकवलीत ८३,५८५ पैकी ४९,९९२ (५९.८१%), मालवणमध्ये ७४,७२९ पैकी ४४,०१९ (५८.९०%), देवगडमध्ये ५३,१४२ पैकी ३०,३५३ (५७.१२%) आणि वैभववाडीत ३१,९९१ मतदारांपैकी १७,५२९ (५४.७९%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

​जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, त्यावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित ४२ जिल्हा परिषद जागांसाठी ११५, तर ८३ पंचायत समिती जागांसाठी २४४ उमेदवार रिंगणात आहेत. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.