Sindhudurg Zilla Parishad Panchayat Samiti Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी ‘महायुती’ म्हणून एकत्र लढण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला आज (शनिवारी) दुपारपर्यंत निश्चित होईल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

​पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राणे म्हणाले की, “जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. वरिष्ठ पातळीवरील निर्णयानुसार दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्याचा चौफेर विकास आणि पायाभूत सुविधांची कामे आम्ही केली असल्यामुळे जनता महायुतीलाच कौल देईल. या निवडणुकीत विरोधकांचा धुवा उडेल आणि महायुतीचा ‘शत-प्रतिशत’ विजय होईल.”

​राणे यांनी जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ६० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. चौफेर विकास साधला आहे.विकासाच्या याच मुद्द्यावर आणि महायुतीच्या ताकदीवर आम्ही मतदारांसमोर जाणार आहोत. जागावाटप निश्चित झाल्यानंतर तत्काळ प्रचाराचा नारळ वाढवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख शिलेदार शिवसेना प्रवक्ते आमदार दीपक केसरकर , पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब, माजी आमदार प्रमोद जठार,अजित गोगटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आल्यानंतर चर्चा होईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
यावेळी महापालिका विजयाच्या पार्श्वभूमीवर जल्लोष केला आहे. असाच निकाल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत होईल असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.