सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने शिस्तीचा बडगा उगारला असून माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वपरवानगी न घेता रजेवर जाणे आणि शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याच्या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ही कडक पावले उचलली आहेत.
श्रीम. कविता शिंपी या २५ मार्च २०२६ पासून कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय वैद्यकीय रजेवर गेल्या होत्या. या अनधिकृत रजेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या रजेच्या काळातच माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देवगडचे सहाय्यक गट विकास अधिकारी विनायक पाटील यांच्याकडे सोपवला होता.
रजा संपवून श्रीम. शिंपी २७ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. मात्र, त्या रुजू होताच प्रशासनाने त्यांना कार्यभार देण्याऐवजी थेट ‘एकतर्फी कार्यमुक्त’ करण्याचा आदेश बजावला. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांना पुन्हा पदावर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत विनायक पाटील हेच या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. प्रशासनातील कामात कसूर करणाऱ्या आणि शिस्त न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट इशारा मानला जात आहे.
