सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ६१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली असून, ग्रामीण भागातील मतदारांनी आपला कौल देण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, सर्वांचे लक्ष ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
सावंतवाडी अव्वल, वैभववाडीत निरुत्साह :
प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ६९.५४ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल वेंगुर्ला तालुक्यात ६९.०३ टक्के मतदान नोंदवण्यात आले. सर्वात कमी मतदान वैभववाडी तालुक्यात (५४.७९ टक्के) झाले. दुपारपर्यंत मतदानाचा वेग मंद होता, मात्र शेवटच्या दोन तासांत मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याने मतदानाचा टक्का ५०.१० वरून थेट ६१.९८ वर पोहोचला.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी:
सावंतवाडी तालुक्यात १,०४,००० मतदार आहेत. त्यापैकी ७२,३१९ मतदारांनी मतदान केले. ते ६९.५४ टक्के झाले.
वेंगुर्ला तालुक्यात ५८,७८५ मतदार आहेत. त्यापैकी ४०,५७९ मतदान झाले. ते ६९.०३ टक्के झाले.
कुडाळ तालुक्यातील १,१६,६३० मतदारांनी ७०,०७७ मतदानाचा हक्क बजावला. ते ६०.०८ टक्के झाले.
दोडामार्ग तालुक्यातील ३८,२४३ मतदारा पैकी २२,८८१ मतदारांनी मतदान केले. ते ५९.८३ टक्के झाले.
कणकवली तालुक्यातील ८३,५८५ मतदारापैकी ४९,९९२ मतदानाचा हक्क बजावला. ते ५९.८१ टक्के झाले.
मालवण तालुक्यातील ७४,७२९ मतदारा पैकी ४४,०१९ मतदानाचा हक्क बजावला,ते ५८.९० टक्के झाले.
देवगड तालुक्यातील ५३,१४२ मतदारा पैकी ३०,३५३ मतदानाचा हक्क बजावला.ते ५७.१२ टक्के झाले.
वैभववाडी तालुक्यातील ३१,९९१ मतदारा पैकी १७,५२९ मतदानाचा हक्क बजावला ते ५४.७९ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात एकूण ५,६१,१०५ मतदार आहेत. त्यापैकी ३,४७,७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.ते ६१.९८ टक्के झाले.
जिल्ह्यात एकूण ५,६१,१०५ मतदारांपैकी ३,४७,७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १,८०,३२७ पुरुष आणि १,६७,४२२ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५० पैकी ८ आणि पंचायत समितीच्या १०० पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, त्यावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे.उर्वरित जागांसाठी जिल्हा परिषदेकरिता ११५ तर पंचायत समितीसाठी २४४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील एकूण ८१० मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५० निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या १०० गणांसाठी झालेल्या या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. या निकालातून जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व राहणार, हे स्पष्ट होईल.
