​सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांपैकी तब्बल ४१ जागांवर महायुतीने विजय मिळवून जिल्ह्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निकालाने खासदार नारायण राणे यांनी आपला सिंधुदुर्गातील बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य असल्याचे सिद्ध केले आहे.

​भाजपला स्वबळावर बहुमत:

​या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २७ जागा जिंकून स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १४ जागांवर यश मिळवले. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित ६ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

​राणे कुटुंबाचा करिश्मा कायम:

​खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि , माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी महायुतीचा फॉर्म्युला जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही प्रमुख तालुक्यांत महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला.

​बंडखोरी आणि अदृश्य शक्तीची चर्चा:

​निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असला तरी, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात काही ठिकाणी बंडखोरीचा फटका बसला. निवडून आलेल्या ६ अपक्षांमध्ये महायुतीच्याच बंडखोरांचा समावेश असून, त्यांना सत्ताधारी गोटातील एका ‘अदृश्य शक्ती’ने आर्थिक बळ दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, निवडून आलेले काही अपक्ष पुन्हा भाजपलाच मदत करण्याची शक्यता आहे.

​उद्धवसेनेची पीछेहाट:

​जिल्ह्यावर एकेकाळी पकड असलेल्या उद्धव ठाकरे गटासाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे. सात पैकी अनेक तालुक्यांत या गटाला साधे खातेही उघडता आले नाही. केवळ ३ जागा मिळाल्याने जिल्ह्यातील त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे.