सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडले आहे. दुपारी ३:३० वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ५०.१० टक्के मतदान झाले असून सावंतवाडी तालुक्याने आघाडी घेतली आहे.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी (दुपारी ३:३० पर्यंत):
दुपारी ३:३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मतदारांचा ओघ वाढल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वाधिक मतदान सावंतवाडी तालुक्यात ५५.३८ टक्के झाले असून, सर्वात कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात ४५.२४ टक्के इतके नोंदवले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका मतदानाची टक्केवारी
सावंतवाडी ५५.३८ टक्के,
वेंगुर्ला ५३.०३ टक्के,
कणकवली ५०.७० टक्के,
देवगड ४९.४५ टक्के,
वैभववाडी ४९.१७ टक्के,
कुडाळ ४७.४५ टक्के,
मालवण ४७.३० टक्के,
दोडामार्ग ४५.२४ टक्के मतदान झाले.
सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुरुवातीला वेग मंद होता, मात्र जसजसा दिवस पुढे सरकला तसतसा मतदारांचा उत्साह वाढत गेला. दुपारी १:३० वाजेपर्यंत जिल्ह्याची टक्केवारी ४०.१३ टक्के होती, जी पुढील दोन तासांत ५०.१० टक्के पर्यंत पोहोचली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गट आणि १०० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ही टक्केवारी ६० ते ६५ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ४२ आणि पंचायत समितीच्या ८३ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, त्यावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित जागांसाठी आता प्रत्यक्ष रणधुमाळी उडणार असून, जिल्हा परिषदेसाठी ११५ तर पंचायत समितीसाठी २४४ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ६१ हजार १०५ मतदार असून यामध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. एकूण ८१० मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडली आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येथे तर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा या ठिकाणी मतदान केले.
