सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, उद्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महायुती झाली असली, तरी विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी गटातील अपक्ष रिंगणात उतरल्याने ‘पाडापाडी’चे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात युती न झाल्याने कुरघोडीचे प्रयत्न झाले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला जाहीर केला. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक अपक्ष उमेदवार उतरवून शिंदे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्यासमोर आव्हान उभे करण्यात आले आहे. आमदार केसरकर यांनी सर्व भिस्त खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर ठेवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
दुसरीकडे, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण सुरू असल्याची चर्चा आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. भाजपच्याच काही अधिकृत उमेदवारांना पाडण्यासाठी पक्षातील नेत्यांनी अपक्षांना रसद पुरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, यामुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ४२ आणि पंचायत समितीच्या ८३ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, त्यावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित जागांसाठी आता प्रत्यक्ष रणधुमाळी उडणार असून, जिल्हा परिषदेसाठी ११५ तर पंचायत समितीसाठी २४४ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ६१ हजार १०५ मतदार असून यामध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. एकूण ८१० मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडेल. प्रशासनाने दुर्गम भागातील ७० मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीसाठी ५,४४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काही मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल केंद्रावर भेट दिली तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समीर घारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.
