सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी ‘नव्या चेहऱ्यांना’ मोठी संधी दिली आहे. एकूण ५० सदस्यांपैकी तब्बल ४० सदस्य पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढणार असून, केवळ १० अनुभवी सदस्यांना आपले अस्तित्व टिकवता आले आहे. अनेक माजी अध्यक्षांसह दिग्गज पदाधिकाऱ्यांना पराभवाचा धक्का बसला असून, मालवण तालुक्याने सर्वाधिक महिला प्रतिनिधी सभागृहात पाठवण्याचा मान मिळवला आहे.

१० अनुभवी सदस्यांकडे नेतृत्वाची धुरा

​नव्या सभागृहात जुन्या-जाणत्या १० सदस्यांचा अनुभव कामी येणार आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत (नाटळ), दीपलक्ष्मी पडते (आंब्रड) आणि सुमेधा पाताडे (सुकळवाड) यांचा समावेश आहे. याशिवाय माजी सभापती प्रितेश राऊळ (रेडी), संजय बोबडी (पुरळ), प्रमोद कामत (बांदा), संतोष साटविलकर (पेंडूर) हे देखील विजयी झाले आहेत. सावी लोके (किंजवडे), सोनाली गाडगीळवार (आडवली-मालडी) आणि मायकल डिसोजा (कोलगाव) यांनीही पुन्हा एकदा विजय मिळवत आपला गड राखला आहे.

​दिग्गजांना पराभवाचा झटका

​या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे. माजी अध्यक्ष संजय पडते यांचा नेरूर प्रभागातून रूपेश पावसकर यांनी पराभव केला. माजी अध्यक्षा समिधा नाईक (आडेल), माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर (माटणे), माजी सभापती वंदना किनळेकर (म्हापण) आणि शर्वाणी गावकर (आरोंदा) यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे वंदना किनळेकर आणि माजी सदस्य अमरसेन सावंत यांचा केवळ २२ मतांच्या निसटत्या फरकाने पराभव झाला.

​मालवणच्या महिला सदस्यांचा डंका

​नव्या सभागृहात महिलांचे वर्चस्व लक्षणीय असणार आहे. यामध्ये मालवण तालुक्याने बाजी मारली असून तेथून सर्वाधिक ५ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्याखालोखाल देवगड आणि कणकवलीतून प्रत्येकी ४, तर सावंतवाडी आणि कुडाळमधून प्रत्येकी ३ महिला सदस्य विजयी झाल्या आहेत. वेंगुर्ले, वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यातून प्रत्येकी २ महिला सदस्यांनी विजय मिळवला आहे.

​माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि कै. विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उच्चशिक्षित असलेल्या विक्रांत सावंत यांच्या रूपाने जिल्हा परिषदेला एक नवा आणि अभ्यासू चेहरा मिळाला आहे.
​प्रशासनाकडून नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी आणि पहिल्या सभेसाठी जिल्हा परिषद भवन सज्ज करण्यात येत असून, नवीन विचारांच्या या सभागृहाकडून जिल्ह्याच्या विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.