​सावंतवाडी: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटू लागले असून, याचा थेट फटका व्यावसायिक आणि घरगुती गॅस पुरवठ्याला बसला आहे. कुडाळ औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) सुमारे ३० उद्योगांचा व्यावसायिक गॅस पुरवठा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याने उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ एमआयडीसीमधील अनेक उद्योग उत्पादनासाठी गॅसवर अवलंबून आहेत. विशेषतः निर्यातीशी संबंधित असलेल्या कंपन्यांचे परदेशातील ग्राहकांशी करार असल्याने, उत्पादन ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार आहे. शासनाच्या सूचनांवर विश्वास ठेवून उद्योजकांनी अतिरिक्त साठा केला नव्हता, मात्र आता अचानक सेवा खंडित झाल्याने गंभीर पेच निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येबाबत कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना तातडीने निवेदन सादर केले आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा त्वरित आणि नियमित सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दुसरीकडे, घरगुती गॅस पुरवठ्यावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची गर्दी वाढत असून सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने गृहिणींची मोठी धांदल उडाली आहे. अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.