हजारो अनाथ लेकरांची माय म्हणून उभ्या महाराष्ट्राला चिरपरिचित असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या जाण्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला पोरकं झाल्याची भावना दाटून येत असताना सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातल्या गॅलेक्सी रुग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सिंधुताई सपकाळ यांच्या असंख्य आठवणी जागवल्या जात आहेत. त्यातलीच एक आठवण म्हणजे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी तो आपल्या लेकरांना अर्पण केला होता. अनाथांची माय या आपल्या नावाला सार्थ ठरावी अशीच त्यांची ही कृती नव्हती काय?
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या…
मला खरं वाटत नाही की मला हा पुरस्कार मिळाला आहे. माझा खरा परिचय म्हणजे रेल्वेत भीक मागणारी बाई. रात्री भिकाऱ्यांना मी खाऊ घालायचे. मला गाणं म्हटलं की खाणं मिळायचं. रात्री मला भिती वाटायची कारण सगळे भिकारी झोपून जायचे. त्यामुळे मी स्मशानात जायचे. कारण मला माहिती होतं की मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही, रात्री भुताच्या भितीने कुणीच येत नाही. त्यामुळे स्मशानात अंधार, ओरडणारे पक्षी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजणारी मी.. फार भयाण होतं ते. आता त्या कल्पनेनंही माझ्या अंगावर काटा येतो. माझ्याकडे काही मुलंच असता असं नाही. मुली असतात, विधवा असतात, परित्यक्ता असतात. मी शोधून आणते. माझं हे दु:खितांचं घर आहे. हे दु:ख असंच चालत राहिलं असतं. पण जगानं सढळ हातांनी मदत केली. म्हणून माझे लेकरं जिवंत राहिले. म्हणून त्या मदत देणाऱ्या हातांना मी हा पुरस्कार अर्पण करते. मी हाफ टाईम मराठी चौथी पास नववारी जिंदाबाद. हा पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्यासाठी धक्का आहे. मी फक्त जगत गेले, चालत गेले. फक्त मागे वळून पाहिलं एवढंच. सरकारलाही धन्यवाद देते. तुम्हा सर्वांना माझा पुरस्कार अर्पण करते. या पुरस्कारावर माझ्या लेकरांच्या भुकेचा अधिकार आहे, त्यांनी जगलेल्या, सहन केलेल्या वेदनेचा अधिकार आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत झालाच. म्हणून तुम्हा सर्वांना मी माझा हा पुरस्कार अर्पण करते बाळा!
लोकसत्ता लाईव्हशी बोलताना सिंधुताई सपकाळ यांनी पद्मश्री पुरस्कारावर ही प्रतिक्रिया दिली होती.