छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याचं लक्षात आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख करण्याचा काहीही उद्देश नव्हता. माझ्याकडून तसा उल्लेख झाल्याने मी माफी मागतो आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे गिरीश महाजन यांनी?
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनावधानाने झाला. चॅनलवर दाखवलं गेलं तेव्हाच लक्षात आलं की मी अनावधानाने उल्लेख केला. मी जाणीवपूर्वक असा उल्लेख करण्याचा काही प्रश्नच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं आदरस्थान आहे. माझ्याही मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे या विषयाचं राजकारण कुणीही करू नये असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं होतं अमोल मिटकरी यांनी?
एका पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी शिवाजी अवॉर्ड विजेते असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. त्यानंतर आता गिरीश महाजन स्पष्टीकरण देऊन या प्रकरणात माफी मागितली आहे. श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या कार्यक्रमात हा उल्लेख गिरीश महाजन यांच्याकडून झाला होता. मात्र आपण जाणीवपूर्वक असं काहीही केलं नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर असा वाद सुरू आहे. या वादावरून भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहण्यास मिळतो आहे. कारण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली. भाजपाने आक्रमक भूमिका घेत आम्ही त्यांना धर्मवीरच म्हणणारच असं म्हटलं होतं. तसंच अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊनही आपण भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणं हा द्रोह आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर अजित पवार यांनी द्रोह वाटत असेल तर गुन्हे दाखल करा असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार विरूद्ध भाजपा असा सामना रंगलेला असतानाच छत्रपती शिवरायांचा उल्लेख एका कार्यक्रमात एकेरी केल्याच्या मुद्द्यावरून अमोल मिटकरींनी गिरीश महाजानांवर टीका केली होती. मात्र आपल्याकडून तो उल्लेख अनावधानाने झाला असं म्हणत माफी मागितली आहे.