Sister and brother died agitation Heartbreaking incident Barshi taluka Struggle Disability Welfare Fund ysh 95 | Loksatta

आंदोलनादरम्यान अपंग भावंडांचा मृत्यू; बार्शी तालुक्यातील हृदयद्रावक घटना

ग्रामपंचायतीकडून अपंग कल्याण निधीसाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी कुरुळे कुटुंबीयांसह काही गावकरी मंडळींनी १५ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीसमोर चक्री उपोषण सुरू केले होते.

आंदोलनादरम्यान अपंग भावंडांचा मृत्यू; बार्शी तालुक्यातील हृदयद्रावक घटना
कात्रज-कोंढवा रस्त्यावर वीज अभियंत्याच्या हलगर्जीमुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता)

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी अपंगांच्या विकासासाठी खर्च करण्याचे कायदेशीर बंधन असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात स्मशानभूमीत सुरू असलेल्या चक्री उपोषणात कुटुंबीयांसह सहभागी झालेल्या एका दहा वर्षांच्या अपंग मुलाचा  मृत्यू झाला.

 तीन महिन्यांपूर्वी याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाला निधीचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यातूनच चाललेला आंदोलनात बहिणीपाठोपाठ भावाचाही मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रकार उजेड आला आहे.  चिखर्डे गावात राहणारे रामचंद्र कुरुळे यांची दोन्ही मुले अपंग होती. ग्रामपंचायतीकडून अपंग कल्याण निधीसाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी कुरुळे कुटुंबीयांसह काही गावकरी मंडळींनी १५ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीसमोर चक्री उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने हे आंदोलन बेदखल केले असतानाच पुढे थोडय़ाच दिवसांत रामचंद्र कुरुळे यांची  मुलगी वैष्णवी (वय १३) हिचा आंदोलनस्थळीच मृत्यू झाला होता. त्या वेळी प्रशासन जागे होऊन अपंग कल्याण निधी उपलब्ध होण्यासाठी बैठका घेतल्या. परंतु कायदेशीर अडचणींमुळे मूळ प्रश्न तसाच प्रलंबित राहिला होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर कुरुळे कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. परंतु मृत वैष्णवीच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी झाली नव्हती. मुख्यमंत्री सहायता निधीतून अपघाती मृत्यू प्रकरणात आर्थिक मदत मिळू शकते, कुरुळे कुटुंबीयांसाठी ही तांत्रिक अडचण ठरली.

दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यू पश्चात कुरुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी पुन्हा गावातील स्मशानभूमीत चक्री उपोषण सुरू केले. या आंदोलनात कुरुळे यांचा दुसरा मुलगा संभव यानेही सहभाग घेतला होता. परंतु आंदोलनस्थळी रात्रीच्या गारठय़ामुळे संभवची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

आत्मदहनाचा प्रयत्न

प्रशासन ढिम्मच असल्याचा आरोप आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी गावात पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तात्कळ ताब्यात घेतले.

चिखर्डे गावातील रामचंद्र कुरुळे यांच्या अपंग असलेल्या दोन्ही मुलांची नोंद स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून मदत उपलब्ध होण्यास तांत्रिक अडचण आहे. संभव कुरुळे यास आंदोलनस्थळी नव्हे तर घरात त्रास सुरू होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीच्या मृत वैष्णवीच्या प्रकरणात मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी पाठविलेला प्रस्तावही तांत्रिक अडचणीमुळे मंजूर होऊ शकला नाही. दिव्यांग कल्याण निधीसाठी अडचणी आहेत. तरीही यासंदर्भात जे जे आवश्यक आहे, त्याची पूर्तता होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

– शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST
Next Story
विखे-राष्ट्रवादी संघर्षांच्या नगर जिल्ह्यात नव्याने ठिणग्या