scorecardresearch

दिशा सालियन प्रकरण: पवार-फडणवीस खडाजंगी! अजित पवारांकडून पूजा चव्हाणचा उल्लेख ऐकून फडणवीस म्हणाले, “दिशा प्रकरण…”

फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी मांडलेला मुद्दा खोडून काढला

दिशा सालियन प्रकरण: पवार-फडणवीस खडाजंगी! अजित पवारांकडून पूजा चव्हाणचा उल्लेख ऐकून फडणवीस म्हणाले, “दिशा प्रकरण…”
विधानासभेत पवार-फडणवीस आमने-सामने (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दिशा सालियन प्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. दिशा प्रकरणावरुन शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. त्यावर विरोधी पक्ष नेते आजित पवार यांनी आक्षेप घेत आपली बाजू मांडताना या प्रकरणामध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आल्याचा उल्लेख केला. मात्र यानंतर फडणवीसांनी पुन्हा स्पष्टीकरण देताना अजित पवारांचा मुद्दा खोडून काढला. दिशा सालियन प्रकरणामुळे आजी आणि माजी उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळालं.

मी तिला बदनाम करणार नाही

अजित पवारांनी थेट दिशाच्या आई-वडीलांचा संदर्भ दिला. “आपल्या एखाद्या संस्थेबद्दल शंका येते तेव्हा आपण केंद्रीय संस्थांकडे प्रकरणं पाठवलं जातं. किंवा चौकशी करणाऱ्या केंद्रीय संस्थांकडे प्रकरणं पाठवली जातात. अशाप्रकारचे आदेश उच्च न्यायालय देऊ शकतं. तो त्यांचा अधिकारच आहे. या प्रकरणाबद्दल काय झालं, बोललं गेलं हे मी सगळं इथं बोलणार नाही. आज ती हयात नसताना तिच्याबद्दल बोलणार नाही. ती आपली मुलगी, बहीण असल्यासारखं आहे. म्हणूनच मी याबद्दल बोलून तिला बदनाम करण्याचं कारण नाही,” असं अजित पवार दिशा सालियनबद्दल म्हणाले.

राजकारणाचा आम्हाला खूप त्रास होतोय

तसेच पुढे, “तिच्या आई-वडिलांनी हात जोडून विनंती केली. मधल्या काळात राजकीय लोकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिकेसंदर्भात दिशाचा उल्लेख केला. तो केल्यानंतर तुमच्या पण वाचनात आलं असेल की राजकारणाचा आम्हाला खूप त्रास होतोय. हे मी नाही दिशाचे आई-वडील म्हणत आहेत,” असं अजित पवार यांनी दिशाच्या आई-वडीलांनी जारी केलेलं पत्रक वाचून दाखवताना म्हटलं.

आम्ही जिवाचं बरं वाईट केलं तर…

“आम्हाला जगू दिलं जात नाही. आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती आम्हाला सोडून गेली. यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे. असा सवाल दिशाच्या आई-वडीलांनी केला आहे. जे दावे केले जात आहेत ते चुकीचे आहेत. माझ्या मुलीला बदनाम केलं जातं. सर्व सत्य माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. बदनामी होत राहीली तर आम्ही जगणार नाही. आम्ही जिवाचं बरं वाईट केलं तर त्यासाठी जे जे मुद्दे उपस्थित करतात ते नेते किंवा संबंधित सहकारी जबाबदार राहतील. मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की कुणालाही बदनाम करु नका हे दिशाच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. हे सगळीकडे छापून आलेलं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “काही लोकांना वाटलं पटापट विकेट पडतील पण मला…”; बंडखोरीची आठवण काढत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सीबीआयचाही अजित पवारांनी केला उल्लेख

“त्या राष्ट्रपती मोहोदयांनाही भेटल्या. एखादे आई-वडील पोटतिकडीने सांगत आहेत. स्वत:च्या पोटचा जीव गमावल्यानंतर सांगत आहेत. तिने आत्महत्या केली हे सीबीआयकडून आलेलं आहे,” असं अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं. तसेच पुढे अजित पवार यांनी थेट चौकशी करायची ठरलं तर सगळ्याच प्रकरणाची करावी लागेल असं म्हणत पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला.

पूजा चव्हाणचा उल्लेख करत म्हणाले, “…तर मग सगळ्याच चौकशा झाल्या पाहिजे”

“ही चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षाने आज आमची खूप महत्त्वाची कामं, विषय आहेत. त्यासंदर्भात कुणी काढलं तर मग पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातही चौकशी करा,” असं आजित पवार म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर, “जसे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसा मी होतो. आम्हाला पण काही थोडा अधिकार होता. आम्ही पण सांगत होतो की याची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळेस हेच मान्यवर विरोधी पक्षामध्ये होते. त्या त्यावेळी कशापद्धतीने सभागृह बंद पाडण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा कार्यक्रम झाला हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं,” असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना पूजा चव्हाण प्रकरणाची आठवण करुन दिली. “चौकशा करायच्या असल्या तर सगळ्यांच्याच चौकशा कराव्या लागतील. चौकशी बंद झाली असली तरी रिओपन करता येते,” असं म्हणत अजित पवारांनी भाजपा आणि शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

तिच्या आई-वडीलांची ही इच्छा

आपली भूमिका मांडताना शेवटच्या ओळीमध्ये अजित पवारांनी, “महाराष्ट्रातील जनतेला सत्य कळलं पाहिजे. पण कृपा करुन यामध्ये राजकारण करु नका. तिच्या आई-वडीलांची ही इच्छा आहे. त्या इच्छेचा आपण सन्मान करुयात,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> आरोग्यमंत्र्यांना ‘ओमिक्रॉन’चं नावही घेता येईना! पत्रकारांनी प्रश्न विचारला असता डोकं खाजवत म्हणाले, “आपला जो ‘एमिक्रॉन’…”

सीबीआयचा कुठलाही क्लोजर रिपोर्ट नाही

“सन्माननीय दादा जे बोलले ते न्यूज रिपोर्टच्या आधारे बोलले आहेत. मूळात दिशा सालियान प्रकरण कधीच सीबीआयकडे गेलेली नाही. सुशांत सिंह रजपूत प्रकरण सीबीआयकडे गेलेली. सीबीआयला विचारलं दिशा सालियानबद्दल तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे हे प्रकरण नाही. आम्ही त्याचा तपास केलेला नाही आणि करतही नाही. त्यामुळे त्यासंदर्भात सीबीआयचा कुठलाही क्लोजर रिपोर्ट नाहीय,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, “सीबीआयकडे सुशांत सिंह रजपूतची केस आहे त्यासंदर्भात त्यांनी काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट दाखवलेले आहेत,” असंही फडणवीस म्हणाले.

कोणालाही टार्गेट केलं जाणार नाही

“मी आपल्या मार्फत सभागृहाला, विरोधी पक्षात बसलेल्यांना हे आश्वस्त करु इच्छितो की कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता यासंदर्भात जे काही पुरावे आता मांडले जात आहेत. त्या पुराव्यांच्या आधारावर अतिशय निष्पक्षपणे त्यासंदर्भातील चौकशी होईल. कोणालाही टार्गेट केलं जाणार नाही,” असंही फडणवीस यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 16:08 IST

संबंधित बातम्या