सोलापूर: लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता संपुष्टात आणू पाहणा-या भाजपची उलटी गणती सुरू झाली आहे. भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्षांची तीन मुद्यांवर एकजूट होत आहे. त्याचा परिणाम आगामी काळात दिसून येईल, असा विश्वास माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला आहे.
गुरूवारी, सोलापूर भेटीसाठी आल्यानंतर येचुरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. यावेळी पक्षाचे पाॕलिट ब्रुरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, पक्षाचे जिल्हा सचिव एम. एच. शेख आदी उपस्थित होते.देशातील आर्थिक, सामाजिक, शेती, उद्योग आदी सर्व क्षेत्रातील परिस्थिती गंभीर बनत चालली असून सामान्य जनतेच्या दररोजच्या जगण्यावर हल्ला होत आहे. मोदी सरकारला त्याची चिंता नाही, अशी टीका करीत येचुरी म्हणाले, नवी दिल्लीत लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महिला मल्लांचे आंदोलन चिरडले जात असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे नव्या संसद इमारतीचे राजेशाहीच्या थाटात उद्घाटन करण्यात मश्गूल होते. जणू ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेत होते. महिला मल्लांच्या आंदोलनाविषयी मोदी काहीही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा वाढला आहे. त्याकडेही मोदी लक्ष देत नाहीत.




संसदेची जुनी परंपरा, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेची मूल्ये जतन करण्यासाठी पंतरधान मोदी यांचा प्रामाणिकपणा दिसून येत नाही. उलट, त्यांच्या कार्यकाळात संसदेची अवहेलना होत आहे. मागील वर्षात एकूण ५६ दिवसांच्या संसद आधिवेशनात केवळ जेमतेम दिवसच कामकाज झाले. शेती, कामगार आदी कायदे विनाचर्चा एकतर्फी झटपट मंजूर केले गेले. तब्बल ५० लाख कोटींचा निधी अवघ्या सात मिनिटांच्या अवधीत मोदी सरकारने मंजूर करून घेतला. आता देशातील परिस्थिती बदलत असून मोदींच्या विरोधात सामान्य जनतेचा आवाज पुढे येत आहे. भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. वैचारिक मुद्यांवर संमती असलेल्या मुद्यावर राष्ट्रीय अभियान चालवावे, सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांवर देशभर आंदोलन उभारणे आणि ज्या त्या राज्यांतील स्थानिक परिस्थितीनुसार भाजपच्या विरोधात ताकद वाढविण्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षांमध्ये चर्चा होत आहे. येत्या १२ जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून त्यातून अनुकूल संदेश येईल, असा विश्वास येचुरी यांनी व्यक्त केला.