जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) घटनांमागे केंद्र शासनाचे कटकारस्थान असल्याचा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. ते इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील नाटय़गृहात प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. एन. डी. पाटील होते.
या वेळी बोलताना येचुरी म्हणाले की, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांनी देशविघातक कृत्य केलेले नाही. बाहेरील काही शक्ती यामध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास येते. दिल्ली पोलिसांनी माध्यमांपुढे दिलेला पुरावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले असून याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. देशाच्या अखंडतेला बाधा आणणारे कोणतेही कृत्य चुकीचेच आहे, त्याचे कोणीच समर्थन करणार नाही. दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, मात्र यामध्ये हकनाक एखाद्याचा बळी जाता कामा नये अशी आमची भूमिका आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले आहे. बाजारभाव कोसळला. रुपयाचे मूल्य सर्वात कमी झाले. उद्योग-व्यवसाय बंद पडू लागल्याने बेरोजगारी वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही शासन पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात राजी नाही.
देशातील उच्च वर्गाकडे देशाच्या आíथक व्यवस्थेचा अर्धा हिस्सा असल्याने उर्वरित १० टक्के लोकांना १० हजारांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवता येत नसल्याने गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.