scorecardresearch

परिस्थिती चिंताजनक आहे, राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सावधगिरीचा इशारा

आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

Maharashtra Rain, Konkan Rain
जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य असणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्यानंतर शुक्रवारीही पावसामुळे परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री स्वतः पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- “कोल्हापूरमध्ये अजून मुसळधार पाऊस झाला, तर परिस्थिती चिंताजनक”, मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती

“धरणं आणि नद्या ओसंडून वाहत आहे. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे. त्यानुसार नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. हे सगळं करत असताना करोनाचं संकट टळलेलं नाही. तळई येथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. परदेशातही अशा अतिवृष्टी आणि पुराच्या बातम्या आपण पाहत आहोत. सर्व मिळून संकटाला तोंड देत आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य असणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहे. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावं लागणार आहे. त्याचवेळी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं,” असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-07-2021 at 13:54 IST

संबंधित बातम्या