एजाज हुसेन मुजावर

करोना विषाणूचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोलापुरात येऊन आढावा बैठक घेतली. या निमित्ताने झालेल्या घडामोडी पाहता आढावा बैठकीपेक्षा काँग्रेस पक्षाच्या बैठकच गाजल्याचे दिसून आले. एकंदरीत स्थानिक पातळीवर संपूर्ण शहर व जिल्ह्य़ाला सामावून घेईल असे सक्षम नेतृत्व उरले नसल्यामुळे आणि पक्षबांधणीसाठी गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्यामुळे एके काळी पाळेमुळे घट्ट रोवलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था बिकट होऊ लागली आहे.

जिल्ह्य़ातील करोना विषाणू फैलावाच्या स्थिती हाताळताना आतापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा वाढता संपर्क आणि प्रभाव राहिला आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांचा दर आठवडय़ात एकदा सोलापुरात प्रत्यक्ष भेटीतून संपर्क होतो. याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोन वेळा येऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गेले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही येथे येऊन आढावा बैठक घेतली होती. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दौरा केला होता आणि आढावा बैठकीतून प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतिमान केले होते. या माध्यमातून शहर व जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचा प्रभाव तथा संपर्क वाढला आहे. त्यामुळे पक्षाची नव्याने बांधणी होण्यासाठीही पोषक वातावरण निर्माण होत आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षात मात्र शैथिल्य जाणवत आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा अपवाद वगळता काँग्रेसचा एकही मंत्री करोना परिस्थितीत सोलापुरात फिरकला नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे गेले चार महिने सोलापुरात असले तरी त्यांचा पक्षाच्या व्यासपीठासह काही अपवाद वगळता अन्य सार्वजनिक स्वरूपात वावर कुठेही दिसून येत नाही. यातून त्यांनी यापूर्वी जाहीर के ल्याप्रमाणे खरोखरच राजकीय निवृत्ती घेतली की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचा अपवाद वगळता शहरात काँग्रेसचे अस्तित्वही दिसत नाही. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर हे दोन्ही काँग्रेसचे मंत्री एकत्रितपणे सोलापुरात येऊन गेले. त्यांच्या आढावा बैठकीपेक्षा पक्षाची बैठक अधिक महत्त्वाची ठरल्याचे पाहायला मिळाले.

एकेकाळी संपूर्ण सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर काँग्रेस पक्षाची ताकद आतापर्यंत केवळ सोलापूर लोकसभा मतदारसंघापुरतीच दिसायची. परंतु २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला दारूण पराभव पक्षाच्या पीछेहाटीला कारणीभूत मानला जातो. २०१९ पर्यंत सोलापूर जिल्ह्य़ात  काँग्रेसचे केवळ तीन आमदार होते. आता केवळ प्रणिती शिंदे यांच्या रूपाने एकाच आमदारापुरते पक्षाचे अस्तित्व टिकवून आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी मजबुतीने होण्यासाठी पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे लक्ष घालून रणनीती आखत आहेत.

राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

विशेषत: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन भाजपवासी झाल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूरकडे गांभीर्याने लक्ष देऊन पक्षाला सावरले आहे. प्राप्त परिस्थितीत आज संपूर्ण जिल्ह्य़ात भाजपच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी काँग्रेसच ताकदीने तोंड देऊ शकते, असे दिसते. सोलापुरात काँग्रेस पक्षाला नवऊर्जा देणारा नेताच दिसत नाही. पक्षाची नव्याने बांधणी होणे ही काळाची गरज बनली असताना त्या दिशेने कोठेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना संधी न मिळाल्याचा राग मनात धरून पक्षाच्या स्थानिक युवक कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचा पुतळा जाळला होता. त्याची किंमत स्थानिक नेतृत्वाला चुकवावी लागत असताना दुसरीकडे पक्षाचीही मोठी हानी होत आहे. या परिस्थितीत पक्षाला तारणाऱ्या मेहनती, प्रामाणिक नेतृत्वाची सोलापुरात गरज आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस करोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न होत असताना तिकडे शिवसेनेत मात्र अस्वस्थता दिसून येते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही प्रत्यक्ष शहर व जिल्ह्य़ात पक्षाला सत्तेचा उपयोग होत नसल्यामुळे स्थानिक शिवसेना वर्तुळात नाराजी पाहायला मिळते.