Loha Nagar Parishad Election Results 2025 : राजकीय घराणेशाहीवरून काँग्रेसला वारंवार लक्ष करणाऱ्या भाजपाने नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. दरम्यान या सहाही उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याने भारतीय जनता पक्षाला पराभवाचा धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा पराभव झाल्याने या निकालाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

एकाच कुटुंबातील सहा उमेदवार पराभूत

लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती; तर नगरसेवकपदासाठी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना तिकीट दिले होते. भाजपाच्या या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. परंतु या सर्व उमेदवारांना मतदारांना मोठा धक्का दिला असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा पराभव झाल्याने भाजपाची राजकीय घराणेशाही मतदारांनी नाकारल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

आणखी वाचा : शिवसेना ठाकरे गटाचा दणदणीत विजय; भाजपाला पराभवाचा धक्का, यावल नगरपरिषदेत काय घडले?

भाजपाच्या दिग्गजांनी घेतल्या होत्या सभा

विशेष बाब म्हणजे- लोहा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी सभाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांनी नगरपरिषद निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. त्याशिवाय भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी बैठका घेऊन निवडणुकीची रणनीती आखली होती. परंतु तरीही भाजपाला लोहा नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. पक्षाने एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हा पराभवाचे कारण ठरल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

हेही वाचा : भाजपा शिंदे-पवारांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

लोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा विजय

लोहा नगरपरिषद निवडणुकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १७ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजपाला या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतल्यापासून नांदेडमध्ये भाजपाची ताकद वाढल्याची चर्चा होती. तरीदेखील भाजपाला पराभवाचा धक्का बसल्याचे समोर आले आहे. या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. घराणेशाहीविरोधी नारा देणाऱ्या भाजपलाच मतदारांनी धडा शिकवल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.