अलिबाग- राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची सहा प्रकरणे एकाच दिवसात समोर आली आहे. महिला अत्याचाराशी निगडीत अलिबाग पोलीस ठाण्यात तीन, तळा पोलीस ठाण्यात दोन तर खोपोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.
वावोशी खालापूर येथे राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीची फेसबुक या समाज माध्यमांवर ओळख काढून नंतर तीला लग्नाचे अमिश दाखवून, तीला अलिबाग समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आणून, तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैँगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम मधील विवीध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत पालघर जिल्ह्यातील एक महिला आपल्या कंपनीतील इतर सहकाऱ्यांसह पार्टी करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील अलास्का व्हिला येथे आले होते. पार्टीनंतर या महिलेवर कंपनीतील कोपर खैराणे येथे राहणाऱ्या सहकाऱ्याने बलात्कार केला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसऱ्या घटनेत अलिबाग येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन, घरात बोलावून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून सदर महिलेला दिवस गेले. गर्भधारणा झाल्यावर आधी या महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर नकार दिला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौथ्या घटनेत तळा तालुक्यात मेढा येथील एका तरुणाने अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. मुलीची युपीटी टेस्ट केली असता, ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या पती विरोधात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचव्या घटनेतही मेढा येथील आणखिन एका तरुणांने अल्पवयीन मुलीशी बालविवाह करुन तिला गर्भधारणेस भाग पडल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या विरोधात तळा पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सहावी घटना खोपोली येथे घडली. अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ओळख काढून शेणगाव येथील तुरुणाने तिचा वेळोवेळी विनयभंग केला. आणि शाररिक संबध ठेवण्याची मागणी केली. मुलीने नकार दिला म्हणून तिच्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनामुळे रायगड जिल्ह्यात महिला अत्याचारांचा आणि बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नुकतीच आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासमोर जिल्ह्यातील बालविवाहाच्या कुप्रथेला रोखणे आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रकार थोपवण्याचे आव्हान असणार आहेत. विधानसभेत काँग्रेस गट नेते विजय वड्डेटीवार यांनी रायगड जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत प्रश्न उपस्थित केला.