कडक सुरक्षेत सहा वाहनातून नागपूर मार्गे हत्ती जामनगरच्या दिशेने निघाले ; वन्यजीवप्रेमींचा केवळ समाजमाध्यमावर विरोध

रवींद्र जुनारकर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी हत्तीकॅम्प येथे ठेवण्यात आलेले ४ नर व २ मादी असे एकूण सहा हत्ती गुरूवार १९ मे रोजी सकाळी सहा वाजता राधे क्रिष्णा टेंपल, एलिफंट वेलफअर ट्रस्ट येथे नागपूर मार्गे गुजरात राज्यातील अहमदाबाद जवळील जामनगर येथे सहा वाहनांमधून स्थलांतरीत करण्यात आले. विशेष म्हणजे सदर हत्ती योग्य स्वास्थ, उच्च दर्जाच्या वैद्याकीय देखरेखीसाठी ताडोबातून गुजरात येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी येथे प्रसिध्दला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्यातील बंदिस्त हत्तीच्या उत्तम आरोग्यासाठी व व्यवस्थापनासाठी वन विभाग कटीबध्द आहे. याकरिता विविध तज्ञ व या क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशासकीय संस्थांचा सहयोग घेण्यात येत आहे. वरील सहाही हत्ती एकाच वंशावळीचे असल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संततीमध्ये गंभीर स्वरूपाचे दोष उद्भवण्याची शक्यता होती. त्यामुळे हत्तींना अन्यस्थळी स्थलांतरीत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. राज्य शासनाने हत्तीच्या पुढील जीवनकाळातील योग्य स्वास्थ व उच्च दर्जाचे वैद्यकीय देखरेखीसाठी, अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत उचाराची सोय उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या जामनगर स्थित राधे क्रिष्णा टेंपल, एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, येथे सहा हत्तींना स्थलांतरीत केले. यासाठी प्रोजेक्ट एलिफंट विभाग, केंद्रीय प्राणी संग्रहालय, पर्यावरण, वने आणि हवामान बदल यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे हत्ती आज सकाळी जामनगरच्या दिशेने रवाना झाले. मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग गुजरात यांच्याकडून देखील यासाठी नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आज सकाळी ताडोबात राधे क्रिष्णा टेंपल, एलिफंट वेलफअर ट्रस्टचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा महावत दाखल झाले. सहा वाहनातून हे सर्व हत्ती बोटेझरी कॅम्प येथून नागपूर मार्ग जामनगर येथे रवाना झाले. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या दबावातच हे हत्ती गुजरात येथे पाठविण्यात आल्याची ओरड आता वन्यजीव प्रेमी करित आहेत. दरम्यान आज सकाळी हत्ती जामनगर येथे स्थलांतरीत करतांना एकही वन्यजीव प्रेमी किंवा वन्यजीव संस्था याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली नाही किंवा साधा निषेधही केला नाही. सर्वजण केवळ समाजमाध्यमावर ओरड करित आहेत. प्रत्यक्षात या घटनाक्रमाला थेट समोर येवून कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे चंद्रपुरचे वन्यजीव प्रेमी व पर्यावरणवादी केवळ समाज माध्मावर ओरड करणारे आहेत अशीच सर्वत्र टिका होत आहे.