वर्धा : गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करणाऱ्या रूग्णांवर विशेष देखरेख ठेवण्यासाठी ‘सिक्स मिनिट वॉक’ ही चाचणी अंमलात येणार आहे.  भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ने शिफारस केलेली ही चाचणी आहे. या चाचणीच्या माध्यमातून शरिरातील ऑक्सिजनची पातळी मोजून करोना संसर्गासाठी जोखमीच्या ठरणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतल्या जाणार आहे. आज दत्तपूर येथील प्रतिबंधीत क्षेत्रात या चाचणीचा पहिला प्रयोग करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये विलगीकरण व अन्य उपाय आहेत.

प्रतिबंधक क्षेत्रातील प्रत्येकाची चाचणी करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर ही चाचणी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. या चाचणीत दोन पर्याय आहे. पहिली ‘सिक्स मिनिट वॉक’ व दुसरी ‘वन मिनिट सिट अप’ चाचणी आहेत. पहिल्या चाचणीत सहा मिनिटे चालायचे असून दुसऱ्या चाचणीत एक मिनिट उठाबश्या काढायच्या आहे. जे चालू शकत नाही त्यांना वन मिनिट सिट अप टेस्टचा पर्याय देण्यात आला आहे.

चाचणीपूर्वी व नंतर शरिरातील रक्तातल्या ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमिटरने तपासले जाते. ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली असल्यास व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याची शक्यता धरून त्यास त्वरित उपचारासाठी दाखल केले जाते. या चाचणीमुळे कोविडच नव्हे तर अस्थमा, दमा, हृदयरोग, न्यूमोनिया व अन्य आजाराची माहिती मिळू शकते.

आज दत्तपूरला वैद्यकीय जनजागृती मंच व आयएमएच्या संयुक्त विद्यमाने आशा सेवीकांना याची माहिती देण्यात आली. ४६ व्यक्तींची सहा मिनिट चालण्याची तपासणी झाली. डॉ. अजय डवले, डॉ. माधुरी बोरकर, डॉ. सचिन पावडे, डॉ. संजय मोगरे, डॉ. विपीन राउत यांनी चाचणीबाबत मार्गदर्शन केले. या चाचणीद्वारे रूग्णाची तात्काळ माहिती मिळणे शक्य होत असल्याने येणाऱ्या काळात प्रतिबंधीत क्षेत्रात ही चाचणी करण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हाधिकारी भीमनवार यांनी नमूद केले.