सांगली : जतमधील तीन लॉजवर पोलिसांच्या भरारी पथकाने छापा टाकून ६ महिलांना मुक्त करत सहा जणांविरुध्द अनैतिक मानवी व्यापार केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष भरारी पथकाने जतमधील तीन लॉजवर एकाचवेळी छापेमारी केली. यावेळी या लॉजवर सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी तीन महिला पश्चिम बंगालमधील असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी संबंधित लॉजचे मालक व व्यवस्थापक अशा सहा जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जत पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
किरण लोखंडे टोळी तडीपार
कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या किरण लोखंडे व त्याच्या टोळीतील दोन साथीदारांना दोन वर्षांसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी दिले. किरण लोखंडे (वय २३), संदेश घागरे (वय २२, दोघे रा. वाघमोडेनगर, कुपवाड) आणि सोनू उर्फ बापू येडगे (वय २८, रा. मायाक्कानगर, बामणोली) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर २०२० ते २०२४ या काळात संगनमताने खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, अपहरण आदी गुन्हे दाखल आहेत. यामुळे या टोळीविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. यावर उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर या टोळीवर दोन वर्षांसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश अधीक्षक घुगे यांनी आज दिले.