लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून सोडले आहे. १८ जून रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला एक दुर्दैवी अपघात अशा पद्धतीने समोर आली होती. पण सिया गोयलने म्हणजेच केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच केतनला धक्का दिला. यावेळी लोहगडावर सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरीही उपस्थित होता,अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान केतनच्या आईने सियाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. सिया गोयलला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हटलं आहे केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल यांनी?

माझा मुलगा केतन अग्रवाल हा आता या जगात नाही. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेली व्यक्ती दुसरं तिसरं कुणीही नाही तर सिया गोयल आहे. सिया गोयलचा बॉयफ्रेंडही माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार आहे. सिया गोयलला मी सून मानलं होतं. पण तिने मला आणि माझ्या कुटुंबाला खूप मोठा धोका दिला आहे. माझ्याशी ती खोटंही बोलली आहे. आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. सिया अनेकदा घरी आली होती. पूजा असताना आली होती तेव्हा चांगली राहिली. काही वेळा आम्ही डिनरलाही गेलो. तेव्हाही तिची वागणूक चांगली होती. माझ्या घरी येशील तेव्हा तुला ड्रिंक घेता येणार नाही हे मी तिला मोकळेपणाने सांगितलं होतं. पार्ट्यांना वगैरे मी तुला पाठवणार नाही. पण ती ड्रिंक करायची. तिच्या आई वडिलांनी आमच्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. पूजा गोयल या सर्वाधिक जबाबदार आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा पूजा यांचा फोन आला होता. पूजा म्हणाल्या तुम्ही तुमच्या मुलाला का पाठवता सिया बरोबर? मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मी केतनला जा सांगितलं नव्हतं, तुमची मुलगी इथे आली आणि त्याला खेचून घेऊन गेली लोहगडावर असंही राखी अग्रवाल म्हणाल्या.

सियाला आणि तिच्या बॉयफ्रेंडला फाशीची शिक्षा झाली पाहिजे-राखी अग्रवाल

सिया गोयल जेव्हा घरी यायची तेव्हा ती सामान्य पणे वागायची. हसत-खेळत बोलायची. मला व्हिडीओ कॉलही करायची. सिया असं काही करेल हे मलाच काय कुणालाही त्यावेळी वाटलं नव्हतं. आम्हाला तिच्यावर काहीही संशय आला नाही. आम्ही डिनरला, शॉपिंगला गेलो होतो पण अशा पद्धतीने ती केतनला संपवेल हे वाटलं नव्हतं. आता आमची एकच मागणी आहे की सियाला आणि तिच्या प्रियकराला फशीच झाली पाहिजे, तिच्या आई वडिलांना, भावालाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे. केतन आम्हाला सोडून गेलाय तेव्हापासून आम्हा सगळ्यांची झोप उडाली आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं आहे. लोहगडावर जेव्हा घटना घडली तेव्हा मला सियाचे बूट दिसले नाहीत, तिचा मोबाइल पाहून मला संशय आला होता. तसंच केतनचा चेहरा जेव्हा पाहिला तेव्हाच वाटलं की हा अपघात नसून घातपात आहे. शेवटी तेच समोर आलं असंही राखी अग्रवाल यांनी ANI ला सांगितलं आहे.