केतन अग्रवाल या तरुणाची १८ जून रोजी पुण्यातल्या लोहगडावरुन ढकलून देत हत्या करण्यात आली. ही हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश या प्रकरणाने हादरला आहे. तसंच या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे समोर येत आहेत. सियाच्या आई वडिलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चेतन आणि सिया यांच्यात काही नातं आहे किंवा प्रेमसंबंध आहेत याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. मात्र आता चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा स्नॅपचॅटवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
२३ मे रोजीचा व्हिडीओ समोर?
सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचा २३ मे रोजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे असं सांगण्यात येतं आहे. या व्हिडीओत सिया आणि चेतन दोघंही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. याचाच अर्थ सिया आणि केतन यांचा फेब्रुवारीत साखरपुडा झाल्यानंतरही सिया आणि चेतन हे दोघंही संपर्कात होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते या चर्चांना बळ देणारा हा व्हिडीओ ठरला आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. तसंच सियाच्या कुटुंबाशीही त्यांनी संपर्क साधला, मात्र सियाच्या कुटुंबाने यावर बोलण्यास नकार दिला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसारा हा व्हिडीओ २३ मे रोजीचा असून रात्री ९.३० ला पोस्ट करण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांनी दोघांचेही हात हातात घट्ट पकडले असून दोघंही एकमेकांना प्रेमाने मिठी मारत आहेत असं या व्हिडीओत दिसून येतं आहे. केतन अग्रवालची हत्या झाली त्याआधी तीन आठवड्यांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे असं सांगण्यात येतं आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे अद्याप समोर यायचं आहे. तसंच सिया आणि चेतन का भेटले होते हे कारणही समोर येणं बाकी आहे.

सिया आणि चेतनबाबत सियाचे आई वडील काय म्हणाले होते?
चेतन चौधरी आणि माझा मुलगा यांची ओळख झाली. त्यानंतर चेतन आणि सियाची ओळख झाली. या दोघांमध्ये कुठलेही प्रेमसंबंध नाहीत. हे दोघंही मित्र आहेत. तसंच केतनशी जेव्हा सियाचा साखरपुडा झाला त्यानंतर मी एकदाही हे पाहिलं नाही की तिने केतनला कधी टाळलं आहे. जर तिला चेतन आवडत असता तर तिच्या बोलण्यातून तसं काहीतरी समोर आलं असतं किंवा आई म्हणून मला ते कळलं असतं. पण तसं काहीही मला समजलेलं नाही. तसंच मला हे मुळीच वाटत नाही की चेतन आणि सिया यांचे प्रेमसंबंध होते असं सियाच्या आईने म्हटलं होतं. दुसरीकडे चेतन आणि सिया यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान सियाच्या आई वडिलांनी हे देखील म्हटलं आहे की आमची मुलगी असं काही करेल हे वाटत नाही. पण तिने हे जर केलं असेल आणि कोर्टाने तिला शिक्षा सुनावली तर तिला ती शिक्षा भोगावीच लागेल. ती दोषी असेल तर तिला फाशी दिली तरीही आम्ही काहीही म्हणणार नाही असंही सियाच्या वडिलांनी म्हटलं आहे. ही त्यांची भूमिका समोर आलेली असतानाच आता स्नॅपचॅटवरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता आणखी काय काय पैलू समोर येतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
