Siya Goyal father Pravin Goyal Reaction FDA Action: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या बी. जी. गोयल अँड कंपनी या दुकानावर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धाड टाकली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात भेसळी विरोधात कारवाया करण्यात येत आहेत. अन्नसुरक्षेच्या कथित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गोयल कुटुंबाचे दुकान बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या कारवाईनंतर सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना एफडीएच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच आमच्या कुटुंबाला विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मी तणावाखाली आहे
एफडीएच्या कारवाईच्या अनुषंगाने बोलत असताना प्रवीण गोयल यांनी कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मी न्यायव्यवस्थेचा आणि कायद्याचा आदर करतो. तपासालाही आम्ही सहकार्य करत आहोत. मात्र तरीही माझ्या कुटुंबाला वारंवार लक्ष्य केले जात आहे. मलाच फाशी दिली जात आहे, असे वाटते. यामुळे माझे कुटुंबीय आणि मी बऱ्याच काळापासून तणावात आहोत.”
‘सियाला फाशी द्या’
माझी मुलगी दोषी आढळल्यास तिला कठोर शिक्षा द्या. तिला फाशी द्या. मात्र आता आम्हाला असे वाटते की, कुटुंबालाच फाशी देण्यात येत आहे. रोज काही ना काही विषय पुढे करून कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, असेही प्रवीण गोयल यांनी यावेळी सांगितले.
#WATCH | Pune, Maharashtra: Siya Goyal’s father Praveen Goyal says, "… On the morning of the 14th, at around 11:30 am, Food Department officials visited my shop and collected four samples… The other issue is related to my shop's licence that I have now applied for, expected… pic.twitter.com/cIecbteaU9
— ANI (@ANI) July 16, 2026
एफडीएच्या निर्देशांचे पालन करू
एफडीएच्या कारवाईबाबत सांगताना प्रवीण गोयल म्हणाले, १४ तारखेला सकाळी सुमारे साडे अकराच्या सुमारास एफडीएच्या अधिकाऱ्यांनी माझ्या दुकानाला भेट देऊन चार नमुने घेतले. या नमुन्यांमध्ये हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन यांचा समावेश आहे. नामांकित ब्रँडच्या नावाने याची विक्री होते. याच्या खरेदीची सर्व बिले आमच्याकडे आहेत.

कारवाईबाबत दुसरा मुद्दा सांगताना प्रवीण गोयल म्हणाले की, मी पूर्वी भाड्याच्या जागेतून व्यवसाय करत होतो, काही वर्षांपूर्वी आम्ही स्वतःची जागा घेतली. हा विषय परवान्याशी संबंधित आहे. मी यापूर्वीच परवान्यासाठी अर्ज केला असून आठ ते दहा दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत मला दुकान बंद ठेवण्यास सांगितले आहे. मी त्याचे पालन करत आहे. पण दुकान सील करण्यात आलेले नाही.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भुसार बाजारातील चार क्रमांक गेटमध्ये सिया गोयल हिच्या कुटुंबाचा बी.जी गोयल अँड कंपनी या नावाने सुक्या मेव्याचा पिढीजात व्यापार आहे.
