सिया गोयल या २० वर्षांच्या तरुणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच केतन अग्रवालची १८ जूनला लोहगडावरुन ढकलून देत हत्या केली असा आरोप तिच्यावर आहे. तसंच सिया गोयलचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीनेही तिला या प्रकरणी मदत केली असंही सांगितलं जातं आहे. या प्रकरणात नवेनवे पैलू गेल्या काही दिवसांपासून रोज समोर येत आहेत. दरम्यान पोलिसांनी सिया गोयलने हनिमून मर्डर केस या नावाने देशात गाजलेल्या सोनम रघुवंशी केसचा अभ्यास केला होता. सोनमने तिचा नवऱ्याला मेघालय या ठिकाणी नेऊन ठार केलं होतं. हे दोघं लग्नानंतर मधुचंद्रासाठी मेघालयला गेले होते. या प्रकरणाचा सियाने अभ्यास केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सिया गोयलने केला होता सोनम रघुवंशी प्रकरणाचा अभ्यास
सोनम रघुवंशीने मेघालय या ठिकाणी जाऊन एका उंच शिखरावर घेऊन जात राजावर वार केले होते आणि त्याला ढकलून दिलं होतं. या प्रकरणात तिला तिचा बॉयफ्रेंड आणि त्याने बरोबर आणलेल्या साथीदारांनी साथ दिली होती. ज्यानंतर पुढच्या काही दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला होता. सिया गोयलने हे प्रकरण बारकाईने अभ्यासलं होतं अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे. सिया आणि चेतन या दोघांनीही या प्रकरणाच्या संदर्भातल्या बातम्या तसंच हे प्रकरण काय होतं? सोनम रघुवंशीने कशा चुका केल्या होत्या याबाबत सगळं वाचलं होतं. असं पोलिसांनी सांगितलं. केतन अग्रवालला लोहगडावरुन ढकलून देण्यापूर्वी सिया आणि चेतन या दोघांनीही सोनमने राजा रघुवंशीची हत्या करताना काय काय केलं तो घटनाक्रम अभ्यासला होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सोनम आणि राजाच्या बातम्या सिया आणि चेतनने वाचल्या होत्या-पोलीस
सोनम रघुवंशी प्रकरणात सिया आणि चेतनने काय काय बातम्या वाचल्या होत्या आणि त्यानंतर या दोघांनीही केतनच्या हत्येचा कट कसा आखला याची चौकशी आम्ही आता करतो आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे. सोनमने तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजाला ठार करण्यापूर्वी आणि ठार केल्यानंतर काय चुका केल्या होत्या त्या आपण कशा टाळल्या पाहिजेत याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली होती असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तपासकर्त्यांनी दिलेले पुरावे आणि आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर पुणे सत्र न्यायालयाने सिया आणि चेतन या दोघांना १६ जुलैपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
