Siya Goyal Chats Leak Update: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या हत्येच्या तपासाला आता नवीन वळण लागले आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून सिया गोयलच्या मोबाईल फोनमधून डिलीट केलेले चॅट्स मिळवले आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवालची हत्या केली. या पार्श्वभूमीवर आता सिया गोयलकडून चेतन आणि इतर मित्रांशी झालेल्या संभाषणाची तपासणी केली जात आहे.
पोलिसांच्या मते, एका चॅटमध्ये सिया तिच्या मैत्रिणीला आधार कार्ड मागत आहे. लग्नाला तिकीटे बुक करता यावीत, यासाठी तिने आधार कार्ड मागितले. पण हे सांगत असताना तिने एक धक्कादायक उल्लेख केला. या चॅट्सचे स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत असून न्यूज १८ ने याबद्दलची बातमी दिली आहे.
या कथित संभाषणात सिया गोयल म्हणते, “तुझ्या आधार कार्डच्या दोन्ही बाजू पाठव. लग्नासाठीच्या तिकीटासांठी लागेल. जे लग्न कधीच होणार नाही, तरीही तू पाठवून ठेव.” त्यानंतर मैत्रीण म्हणते की, मी आधीच तुला व्हॉट्सॲपवर कॉपी पाठवल्या आहेत.
पोलीस आता या संभाषणाचा संदर्भ समजून घेण्याचा आणि केतनच्या हत्येपूर्वी आरोपीच्या योजनेबद्दल काही सुगावा लागतो का? हे तपासत आहेत. यासाठी सिया गोयलच्या चॅट्सचे विश्लेषण करण्यात येत आहे. तपासादरम्यान सिया गोयलचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यातील डिलिट केलेले चॅट्स पुन्हा मिळवण्यात आले आहेत.

सिया-चेतन सांकेतिक भाषेत संभाषण करायचे
शुक्रवारी पोलिसांनी सिया गोयलचा आणखी एक फोन हस्तगत केला. इंडिया टुडेला तपास अधिकारी मनोज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे एकमेकांशी सांकेतिक भाषेत चॅटिंग करत असत. यामागचा हेतूचा तपास केला जात आहे. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनच्या अटकेनंतर त्यांच्याकडून प्रत्येकी एक मोबाईल जप्त करण्यात आला होता. मात्र नंतर सियाकडे आणखी एक मोबाईल असल्याचे कळले आणि तोही जप्त करण्यात आला. या नव्या फोनमधून आणखी माहिती समोर येऊ शकते.
सिया-चेतनला १४ दिवसांची पोलीस कोठडी
तपासकर्त्यांनी दिलेले पुरावे आणि आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर पुणे सत्र न्यायालयाने सिया आणि चेतन या दोघांना १६ जुलैपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
