Siya Offensive Photo Controversy : लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरून होणारा पती केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गुरुवारी तपासादरम्यान तिने प्रसारमाध्यमांना आक्षेपार्ह हातवारे केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यावर सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण बोथरा यांनीही त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ते ओडिशा राज्यात रेल्वे आणि किनारपट्टी सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) म्हणून कार्यरत आहेत.
भावनाशून्य आणि निर्दयी वर्तन
आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, “मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक अट्टल गुन्हेगार आणि हत्येच्या आरोपींशी संवाद साधला आहे. जेव्हा पीडित व्यक्ती पूर्णपणे निष्पाप असते, तेव्हा अशा बहुतांश गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात पश्चाताप, दुःख किंवा मानसिक अस्वस्थता दिसून येते.”
ते पुढे म्हणाले, “पण या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या चेहऱ्यावर अशा कोणत्याही भावनेचा लवलेशही नाही, जे अत्यंत भयानक आहे. या प्रकरणातील आरोप पाहता, हा गुन्हा अत्यंत थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला आहे. हत्येनंतरचे तिचे वर्तनही तितकेच संतापजनक आणि निर्दयी आहे.”
काय आहे प्रकरण?
सेल्फी काढताना दरीत पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याची ‘कथा’ त्याची वाग्दत्त वधू सिया गोयल हिने रचली होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना तेथून अपघाती मृत्यू होणे शक्य नसल्याचे ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीमध्ये तब्बल ३३ अंश सेल्सिअस तापमानात हुडी घालून फिरणारा एक तरुण दिसून आला. त्याचा माग काढल्यानंतर तो चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
१८ जून रोजी घटना घडल्यानंतर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, घसरून पडण्याची शक्यता नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे मृत्यूबाबत संशय निर्माण झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
