पंतप्रधानांकडेही तक्रार करणार

सोलापूर : मोठा गाजावाजा करून सुमारे २३०० कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या कामांविषयी सार्वत्रिक ओरड असताना अखेर महापालिकेतील सत्ताधारी भाजपनेही नित्कृष्ट कामांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर त्याचे खापर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे-पाटील यांच्या माथ्यावर फोडले आहे. या मुद्द्यावर महापौर व सभागृह नेत्यांसह भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयासमोर निदर्शनेही केली.

पाच वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता येण्यापूर्वी मोदी सरकारने देशातील पहिल्या दहा शहरांची ‘स्मार्ट सिटी’ साठी निवड केली होती. त्यात सोलापूरचाही समावेश झाला होता. सुमारे २३०० कोटी एवढा घसघशीत निधी खर्च करून शहराचा विकास होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या वेळी त्याचे श्रेय घेत भाजपने मोठा जल्लोष केला होता. एवढा गाजावाजा झाल्याच्या पाश्र्वाभूमीवर २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपवर विश्वाास दाखवून महापालिकेची सत्ता त्यांच्या हाती दिली होती.

केंद्रात व राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार असल्यामुळे सोलापूर शहराच्या विकासात कसलाही अडथळा येणार नाही, याची ग्वाही भाजपने दिली होती, प्रत्यक्षात महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर ‘स्मार्ट सिटी’सह महापालिकेच्या कारभारावर कधीही पकड ठेवता आली नाही, तर पक्षांतर्गत गटबाजी हीच भाजपची कार्यसंस्कृती समोर आली.

या पाश्र्वाभूमीवर ‘स्मार्ट सिटी’ची कामे होत असताना त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून भाजपला पार पाडली नाही. अलीकडे ‘स्मार्ट सिटी’ची कामे नियोजनशून्य पद्धतीने सुरू असताना त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाच सोसावा लागत आहे. त्याबद्दलचा दोष सत्ताधारी भाजपला दिला जात आहे. महापालिकेची आगामी निवडणूकही तोंडावर आली आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत भाजपने सत्ताधारी म्हणून स्वत:ची जबाबदारी प्रशासनावर ढकलणे सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी सात रस्त्यावर ‘स्मार्ट सिटी’ कायाालयासमोर महापौर श्रीकांचना यन्नम, पालिका सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्यासह भाजपच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे-पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यांच्या बडतर्फीची मागणीही केली.

या आंदोलनात पालिकेचे माजी सभागृहनेते सुरेश पाटील, श्रीनिवास करली यांच्यासह नगरसेवक नागेश भोगडे, विनायक विटकर, नारायण बनसोडे, अविनाश पाटील, अमर पुदाले, राजेश अनगेरी, वैभव हत्तुरे, नगरसेविका वंदना गायकवाड, कल्पना कारभारी, निर्मला तांबे, राजश्री कणके, सोनाली मुटकरी, संगीता जाधव आदींचा सहभाग होता.

शहरातील स्मार्ट सिटीची कामे अतिशय नित्कृष्ट दर्जाची असून त्यावर सोलापूर व माढ्याच्या दोन्ही खासदार व सर्व सात आमदारांसह महापालिकेतील भाजपचे शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ न दाद मागणार असल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम व सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी सांगितले.