अंध मुला-मुलींसाठी कोकणातील एकमेव निवासी व्यवस्था असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयामध्ये व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्याची योजना असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे.
प्रकाशाच्या वाटेवरचे प्रवासी
रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यात घराडी येथे स्थापन करण्यात आलेल्या या विद्यालयाने यंदा आपल्या वाटचालीचं दशक पूर्ण केलं. कोकणच्या निरनिराळ्या भागातील ५ ते १८ वयोगटातील ३० मुलं-मुली येथे राहून शिक्षण घेत आहेत. पण अशा मुलांना खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या मिळण्याची शक्यता कमी असते, हे लक्षात घेऊन विद्यालयाच्या संस्थापक-अध्यक्ष आशाताई कामत यांनी त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची योजना आखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या केन वायरच्या पिशव्या, काथ्यापासून पायपुसणी, प्लास्टिकची फुलं, हार, तोरणं, फुलदाण्या, कागदी पिशव्या इत्यादी वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यामध्ये आणखी काही व्यवसायाभिमुख उपक्रमांची भर घालून स्वतंत्र व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे. तसेच या केंद्राचं कार्य केवळ ‘स्नेहज्योती’च्या मुलांपुरतं मर्यादित न ठेवता अंध स्त्रियांनाही विविध कलांचं प्रशिक्षण देऊन स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी प्रवृत्त करण्याचं आशाताईंचं स्वप्न आहे. या शाळेत शिकवणारे शिक्षक बाहेरगावाहून येथे आलेले आहेत. त्यांच्या निवासाची स्वतंत्र सोय नसल्यामुळे सध्या ते विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातच राहत आहेत. त्यांच्या स्वतंत्र निवासाची सोय करण्याचीही गरज आहे. गेली दहा र्वष ही शाळा पूर्णपणे विनाअनुदान तत्त्वावर चालवली जात आहे. त्यामुळे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना आशाताईंची बरीच धावपळ होते. प्रसंगी पदरमोड करून खर्च भागवावे लागतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी संस्थेला भरीव कायमस्वरूपी निधीचीही गरज
आहे.