उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत करोनाबाधितांची संख्या तब्बल साडेचार हजारांवर पोहोचली आहे. त्याप्रमाणात करोनातून बरे होणार्‍या रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे. वयोवृध्द व हायरिस्कमधील १२२ जणांचा आजवर करोनाने बळी घेतला असून,  जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ५६ रूग्णांना तर आजवर दोन हजार ५०८ जणांना रूग्णालयातून उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आहे. सध्या १ हजार ८०० रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२२ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.वाढता संसर्ग लक्षात घेऊन अ‍ॅन्टीजेन किटद्वारे तपासण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ तीन रूग्ण करोनाबाधित होते. १ ऑगस्टपासून अनलॉक-३ सुरू झाला. पहिल्याच दिवसापर्यंत करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार २८३ इतकी होती. अवघ्या २०दिवसात ही संख्या दुप्पट झाली आहे. आरोग्य विभाग सध्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा आणि उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड चाचणी केंद्राकडे संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवित आहे. दिवसभरातील चाचण्यांची क्षमता कमी असल्यामुळे अ‍ॅन्टीजन किटद्वारे प्राथमिक चाचणी करून बाधित रूग्णांवर उपचारासाठी विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. सर्वसामान्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनाही करोनाची बाधा होत आहे. ऑगस्ट महिन्यात उस्मानाबाद, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दररोज दुपारी ३ पर्यंत सर्व आस्थापने सुरू ठेवण्यात येत आहेत. दर शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जात होता. परंतु गणेशोत्सव कालावधीतील शनिवारी जनता कर्फ्यूत नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिथीलता दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयातून औरंगाबाद व उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्रात एकूण २५० स्वॅबचे नमुने पाठविण्यात आले होते. तर ८९४ जणांची अ‍ॅन्टीजन टेस्ट किटद्वारे करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यात ७८, तुळजापूर २०, उमरगा २१, कळंब ३१, परंडा २०, लोहारा दोन, भूम २३ व वाशी तालुक्यात पाच, असेे एकूण २०० रूग्ण करोनाबाधित आढळले आहेत. अ‍ॅन्टीजन टेस्टमधून ७७६ तर स्वॅब नमुना चाचणीत एकूण १४१ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. सर्वाधिक रूग्ण ग्रामीण भागातील आहेत.

चाचण्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना
राज्य सरकारने २१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रूग्णांच्या स्वरूपावरून तीन गटात चाचण्यांचे अल्गोरिदम तयार करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या, असलेल्या आणि लक्षणे आहेत, परंतु अहवाल निगेटिव्ह येणे, या प्रकारातील रूग्णांचे वेगवेगळे गट तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे उपचाराबाबत निर्णय घेणे सोपे होणार आहे. सर्व लक्षणे असलेल्या, तत्काळ उपचाराची गरज असलेल्या रूग्णांची अ‍ॅन्टीजन किटद्वारे चाचणी करून अर्ध्या तासात उपचाराबाबत निर्णय घेता येणार आहे. तुरूंगातील कैदी, मनोरूग्ण यांना अगोदर एक आठवडा क्वारंटाइन करून त्यानंतर करोना चाचणी करावी, चाचण्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या दोन-तीन चाचण्या करण्याऐवजी व्यक्तीची एकच चाचणी करावी, लक्षणे नसलेल्या व्यक्तींची चाचणी करू नये. तसेच जास्तीत जास्त सकारात्मक रूग्ण शोधण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.