तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास सुरू; सरपंचांकडून इन्कार
सातपाटी गावातील श्रॉफ मैदानाबाबत उसळलेल्या वादांमध्ये तटस्थ भूमिका घेतल्याने सातपाटी गावातील सनी अनिल चौधरी यांच्या कुटुंबावर ग्रामस्थांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याची तक्रार सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गावकरी आपल्याकडून मासे विकत घेण्यास व्यापाऱ्यांना प्रतिबंध करत आहेत, त्याशिवाय देवस्थान विश्वस्त समितीतून पदाधिकारी म्हणून कमी करणे, सार्वजनिक स्पर्धामध्ये भाग घेऊ न देणे, गावात कुणाशीही संबंध ठेवू न देणे अशा प्रकारे सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
सातपाटीतील श्रॉफ मैदानाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर मी आणि माझे वडील अनिल चौधरी यांनी अलिप्त राहून सहभाग न घेणे पसंत केले. याचा रोष ठेवून गावकऱ्यांनी आमच्या घरावर दोन वेळा मोर्चा काढून घोषणाबाजी व दगडफेक केली, असे सनी चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. आपल्या कुटुंबीयांना वाळीत टाका, बहिष्कार करा, व्यवहार बंद करा, असे संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवण्यात आले आहे, असे त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आपली सात वर्षांची मुलगी त्रिशा शिकवणीला जाते, मात्र तेथील शिक्षिका व अन्य विद्यार्थ्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले. त्रिशा गैरहजर असल्यास तिला कुणीही राहिलेला अभ्यास देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. आपला मासेमारीचा व्यवसाय आहे. मात्र आपल्याकडची मासळी गावातील मोठे व्यापारी खरेदी करत नाहीत. आपले वडील अनिल चौधरी हे श्रीराम मंदिर संस्थानमध्ये २०१७ ते २०२२ या कालावधीकरिता घटनेप्रमाणे मांगेला समाजाकडून निवडून आले होते. मात्र गावकऱ्यांनी वडिलांच्या विरोधात खोटय़ा तक्रारी करून सह्यांची मोहीम राबवून ट्रस्टमधून बेकायदा काढण्यास मांगेला समाजास भाग पाडले, असे सनी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात ११ जानेवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीची चौकशी सुरू आहे. या तक्रारीत तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यात येईल, असे सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयेश ठाकूर यांनी सांगितले.
अनिल चौधरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी श्रॉफ मैदानाच्या दाव्यामध्ये गावकरी पराभूत झाल्यानंतर फटाके फोडले होते. त्यामुळे गावातील अनेक मंडळी दुखावली गेली होती, तरीही सातपाटीच्या ग्रामस्थांनी या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकलेला नाही. अनिल चौधरी यांच्या कुटुंबाला मच्छीमार सहकारी सोसायटीमधून कर्ज, बर्फ, डिझेल, औद्योगिक साहित्य नियमितपणे दिले जाते. ग्रामपंचायतीने त्यांना वैयक्तिक दाखलेही दिले आहेत. गावातील व्यापारी अनिल चौधरी यांच्या बोटीतील मासे खरेदी करतात.
– अरविंद शंकर पाटील, सरपंच, सातपाटी