Nirmala Nawale Election Result: माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले यांचा सोशल मीडियावरचा वावर एखाद्या एन्फ्लुएन्सरलाही मागे टाकेल, असा आहे. उच्चशिक्षित असलेल्या निर्मला नवले या रिलच्या माध्यमातून आपली कामे लोकांसमोर घेऊन जात असतात. या तंत्रज्ञानाचे मर्म अचूक समजल्यामुळे अल्पावधितच निर्मला नवले यांचा मोठा चाहता वर्ग सोशल मीडियावर तयार झाला होता. मात्र ही आभासी प्रसिद्धी त्यांना प्रभागात कामाला आली नाही. भाजपाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) तिकिटावर शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. सोशल मीडियावर प्रभावी प्रचार करणाऱ्या नवलेंचा या निवडणुकीत निभाव लागू शकला नाही. भाजपाच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी त्यांचा पराभव केला.

उच्चशिक्षित राजकारणी म्हणून ओळख

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले यांचे इन्स्टाग्रामवर ५ लाख ७५ हजार फॉलोअर्स आहेत. आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता वाढली.

कारेगाव पंचायत समिती गटातून निर्मला नवले यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच नवले यांनी सोशल मीडियावर प्रभावी प्रचार केला होता. त्यांच्या चौक सभा आणि छोट्या रॅलींनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावर त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून त्यांचा सहज विजय होईल, असे बोलले जात होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ आणि १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी शनिवारी मतदान पार पडले. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विजय मिळवला आहे. पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेला ३७ चा आकडा पार केला आहे.

पुणे जिल्हा परिषद निकाल

एकुण जागा – ७३ पैकी ५५ जागा निकाल जाहीर

राष्ट्रवादी (अजित पवार) – ३९
भाजप – ८
शिवसेना (शिंदे) – ४
शिवसेना (ठाकरे) – ३
राष्ट्रवादी (शरद पवार) – १
काँग्रेस-०
अपक्ष ०