Anjali Damania X post on Sunetra pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचे निधन झाल्यानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांच्या या कृतीवर टीका होत आहे. यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केली आहे.

“अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

त्यांनी यावेळी दोन मागण्याही केल्या. त्या म्हणाल्या, “१. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा; २. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा.”

“पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे, धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरतांना दिसले. संधीसाधू माणूस. परत येण्याची तडफड दिसतेय”, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात राजकीय वैर होतं. परंतु, अजित पवारांच्या निधनानंतर अंजली दमानिया यांनी त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली होती. त्या म्हणाल्या, “अजित पवार यांच्याविरुद्ध मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ संघर्ष केला. तो वैचारिक आणि तत्त्वांचा लढा होता. काल त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपला आहे. मतभेद तीव्र होते, पण मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात. आज हा क्षण विचार करण्याचा आहे..लोकशाही, मूल्ये आणि संघर्ष यांचा. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असं अंजली दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

तर, “सत्ता आणि स्वार्थ आता हेच एकमेव सत्य आहे. पूर्ण महाराष्ट्र हळहळत होता, अगदी माझ्यासारखी व्यक्ती, जी अजित पवारांविरोधात अगदी टोकाचं लढली, १५ वर्ष मी लढा दिला… तरी ज्या पद्धतीने त्यांचा अपघात झाला, अतिशय अस्वस्थ, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. असं व्हायला नको होतं असं वाटत होतं. पूर्ण महाराष्ट्रातील जनता हळहळत होती, आणि अशातच अगदी तीनच दिवसात… काल अस्थी विसर्जन झालं आणि रात्री तिकडून सगळी मंडळी मुंबईला रवाना झाली. का? तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची म्हणून, मला हे कुठेतरी खटकलं,” असंही अंजली दमानिया काल म्हणाल्या.