शेतक-यांची शेकडो एकर जमिनी बळकावणा-या भूखंडमाफियांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि वैज्ञानिक अरुण देशपांडे यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. या धमक्यांमुळे त्यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे.
मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे देशपांडे गेली २८ वष्रे विज्ञान संशोधनाचे काम करत आहेत. या परिसरातच काही भ्रष्ट अधिकारी, राजकीय पुढारी आणि भूखंडमाफियांनी भूलथापा मारून शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन बळकावली. या विरोधातच देशपांडे यांनी नुकताच लढा उभारला आहे. त्यांच्या या आंदोलनास यश येऊ लागल्याने देशपांडे व त्यांच्या कुटुंबीयांना या भूखंडमाफियांकडून दमबाजी सुरू झाली आहे.
या भूखंडमाफियांनी मोहोळ तालुक्यात अंकोली, शेज बाभुळगाव, कुरूल इत्यादी गावांतील तब्बल ४५० एकर जमीन लुबाडली आहे. या वेळी पैसे, शिक्षण, नोक ऱ्या अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. शेतक ऱ्यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जमिनी परत मागण्यास सुरुवात केली. पण या प्रकरणात प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि गुंड सामील असल्याने उलट त्यांनाच त्रास देण्यास सुरुवात केली. यातूनच या सर्व शेतकऱ्यांनी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष उभा केला आहे.
देशपांडे यांनी हा लढा उभा केल्यावर त्यांना त्रास देण्यास या गुंडांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील एका प्रशासकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच अन्य एका प्रकरणात अटक केली. यानंतर या भूखंड गैरव्यवहारावरही प्रकाश पडू लागला. त्यामुळे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. धमकी देणे, पाठलाग करणे, पोलिसांच्या समक्ष ‘बघून घेण्याची’ भाषा करण्यापर्यंत ही मजल गेली. या पाश्र्वभूमीवर देशपांडे यांना सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे. संरक्षण मिळाल्यानंतरही देशपांडे यांचा भूखंडमाफियांच्या विरोधातील लढा गांधीजींच्या मार्गाने सुरूच आहे.