टाळेबंदीमुळे गेल्या ५३ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अडकून राहिलेल्या १ हजार २४६ स्थलांतरितांना गुरूवारी दुपारी कुर्डूवाडी येथून लखनौकडे श्रमिक रेल्वेने पाठविण्यात आले. हे सर्व स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी आणि व्यावसायिक असून त्यांना लखनौमध्ये प्रवेश देण्यास उत्तर प्रदेश सरकारने संमती दिल्यानंतर सोलापुरच्या जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही केली.

कुर्डूवाडी रेल्वे स्थानकातून दुपारी अडीच वाजता लखनौसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. गेले अनेक दिवस सोलापूर जिल्ह्यात मजुरी, शिक्षण, छोट्या-मोठ्या व्यवसाय-व्यापाराच्या निमित्ताने स्थायिक झालेले हे स्थलांतरीत टाळेबंदीमुळे अडकून पडले होते. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याची ओढ लागली होती. कुर्डूवाडीहून रेल्वेने आपल्या राज्याकडे रवाना होताना काही स्थलांतरितांना गहिवरून आले होते. सोलापूरकरांशी जपलेला ऋणानुबंध यानिमित्ताने व्यक्त झाला. कुर्डूवाडी सोडण्यापूर्वी प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

२२ डब्यांच्या या श्रमिक रेल्वेगाडीतून १ हजार २३६ प्रवासी रवाना झाले. एका डब्यात ५४ प्रवासी सामाजिक अंतराचे पालन करून पाठवण्यात आले. त्यासाठी प्रवासी भाडे म्हणून तब्बल आठ लाख ९ हजार ५८० रुपये रेल्वे प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहे. एका प्रवाशाला ६५५ रुपये इतके भाडे आकारण्यात आले आहे. अर्थात संपूर्ण प्रवास खर्चाचा भार शासनाने उचलला आहे. ही रेल्वे विनाथांबा असून उद्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता लखनौला पोहोचण्याची अपेक्षा आहे. प्रारंभी या सर्व नागरिकांची महसूल, पोलीस, रेल्वे व रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेने केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले. प्रांताधिकारी ज्योती कदम,उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. विशाल हिरे, तहसीलदार राजेश चव्हाण, कुर्डूवाडीचे नगराध्यक्ष समीर मुलाणी,गटविकास अधिकारी डाॅ.संताजी पाटील, मुख्याधिकारी कैलास गावडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष अडागळे, पुरवठा अधिकारी रविकिरण कदम,पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे,कुर्डूवाडी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव दरेकर,स्टेशन प्रबंधक आर.डी.चौधरी आदींनी निरोप दिला.

कुर्डूवाडीहून रवाना झालेल्या स्थलांतरीत प्रवाशांमध्ये माढा-३२१, माळशिरस – २९०, सांगोला – २३२, मोहोळ -१८६, बार्शी -९५, उत्तर सोलापूर -५५, दक्षिण सोलापूर -३६, करमाळा – १४, अक्कलकोट- ४ आणि मंगळवेढा -३ याप्रमाणे तालुकानिहाय प्रवाशांची संख्या होती.