सोलापूर : समाज माध्यमातून मैत्री करीत आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका तरुणीने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने शिक्षकाला लुटण्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडला. दिवसाढवळ्या घडलेल्या या गुन्ह्याची नोंद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. आण्णा मारुती वाघमारे (वय ४६, रा. कोर्टी, ता. पंढरपूर) असे लुबाडणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते पंढरपूर तालुक्यातील टाकळीजवळ आनंदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकपदावर सेवेत आहेत. त्यांना पत्नीसह तीन अपत्ये आहेत.

हेही वाचा – ‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

हेही वाचा – Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

वाघमारे यांना समाज माध्यमातून स्वाती भोसले नावाच्या तरुणीने मैत्री केली आणि त्यांचा भ्रमणध्वनी आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मागितला. नंतर तिने चॅटिंग करून वाघमारे यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिने कोरफळे (ता. बार्शी) येथे त्यांना भेटण्यासाठी येण्यास सांगितले. त्याप्रमाणे वाघमारे हे आपल्या मोटारीतून मित्र संजय भगवान राऊत यांना सोबत घेऊन कोरफळे येथे आले. वाटेत स्वाती भोसले आणि वाघमारे यांच्यात तीन-चार वेळा व्हिडिओ कॉल झाले. कोरफळेजवळ आल्यानंतर स्वाती भोसले हिने मित्राला तेथेच सोडून एकटेच भेटण्यासाठी येण्यास सांगितले. त्याप्रमाणे वाघमारे मोटार घेऊन एकटेच पुढे गेले असता स्नेहग्राम शाळेच्या पाठीमागे स्वाती भोसले हिची भेट झाली. वाघमारे यांनी तिला मोटारीत बसण्यास सांगितले. परंतु त्याच क्षणी स्वाती भोसले हिने इशारा करून अन्य तिघाजणांना बोलावले. या सर्वांनी वाघमारे यांच्या अंगातील १२ तोळे सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी आणि २७ हजारांची रोकड असा एकूण तीन लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज बेदम मारहाण करून लुटला.