सोलापूरच्या सतत विस्कळीत होणार्या विमानसेवेमुळे नवीन औद्योगिक गुंतवणूक आणि नियोजित आयटी पार्क प्रकल्प धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या येत्या सोलापूर दौऱ्यात या प्रश्नावर सविस्तर बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. ‘सोलापूर विकास मंच’च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सोलापूरची ठप्प झालेली विमानसेवा, अभियांत्रिकी महाविद्यलय, आयटी व गारमेंट पार्क याबाबत निवेदन देण्यात आले. प्रशासनाने या विषयाची दखल घेत तातडीने बैठकीचे आश्वासन दिले. सोमवारी सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात बैठक झाली.
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा अनिश्चित काळासाठी ठप्प झाली असून, गोवा आणि हैदराबाद मार्गांवरील फेऱ्याही लहरी ठरत आहेत. तिरुपती सेवा अद्याप केवळ कागदावरच आहे. या पार्श्वभूमीवर मंचाने घेतलेल्या जनमत चाचणीत नागरिकांचा तीव्र संताप समोर आला. “विमानसेवा ही केवळ निवडणुकांतील घोषणांपुरती मर्यादित न राहता शहराच्या आर्थिक अस्तित्वाचा आणि विकासाचा मूलभूत पाया आहे,” अशी आग्रही भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
शहरात नवीन उद्योग आणि आयटी पार्क उभारणीच्या हालचाली सुरू असताना विमान सेवेची अनिश्चितता हा मोठा अडथळा ठरत आहे. मुंबई, पुणे, गोवा आणि देशातील प्रमुख शहरांशी थेट संपर्क नसल्यास बाहेरील गुंतवणूकदार आणि कंपन्या सोलापूरला प्राधान्य देणार नाहीत. परिणामी स्थानिक रोजगारनिर्मितीस मोठा फटका बसेल, याकडे लक्ष वेधण्यात आले.
सोलापूर शहरातील सध्याच्या होटगी रस्ता विमानतळावर नाईटलँडींगची सुविधा त्वरीत पूर्ण करून सेवा नियमित करावी, तसेच रखडलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत प्रशासनाने वस्तूस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. दोन्ही पर्यायांचा तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेचा तुलनात्मक अभ्यास लोकांसमोर मांडण्याचा आग्रह मंचाने धरला.
पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या आगामी बैठकीत विमान कंपन्यांची जबाबदारी, पायाभूत सुविधांची पूर्तता आणि बोरामणीच्या भवितव्यावर ठोस कृती आराखडा निश्चित होणे अपेक्षित आहे. केवळ तोंडी आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष कालबद्ध अंमलबजावणी होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार विकास मंचाने व्यक्त केला.या शिष्टमंडळात मंचाचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, प्रा. प्रसन्न नाझरे, सुहास भोसले व गणेश पेनगोंडा आदींचा समावेश होता.
सोलापूरसाठी हजारो कोटींचे नियोजन, पदरी प्रतीक्षाच….या मथळ्याखाली लोकसत्ताच्या सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्या बातमीमधील प्रलंबीत विकासकामाचे मुददे मंचच्या सदस्यांनी बैठकीत उपस्थित केले. त्यासंदर्भात पालकमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या सोबतच्या बैठकीत चर्चा करुन मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे, विकास मंचचे केतन शहा यांनी सांगितले.
