सोलापूर: वारंवार सुरू आणि बंद होणाऱ्या सोलापूरच्या व्यावसायिक विमानसेवेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोकळ आश्वासने देऊन सोलापूरकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी थेट सोलापूर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. भाजप सरकार आणि स्थानिक पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कागदी विमाने हवेत उडवून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीच्या कारणात्सव सोलापूर- मुंबई विमानसेवा स्टार एअर कंपनीने बंद केली. दोन महिन्यांपूर्वी बंद झालेली विमानसेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित कंपनीस सुरु करण्यास भाग पाडले होते. पण, त्यानंतर महिनाभरात पुन्हा विमानसेवा बंद पडल्याने सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली. सोलापूर शहरामध्ये नव्याने आयटीपार्क व इतर मोठे उद्योग, गुंतवणूकदार विमानसेवा सुरु असल्याने येण्यासाठी इच्छुक होते. त्यानिमित्ताने सोलापूरच्या विकासाला चालना मिळणार होती. दरम्यान, अचानक विमानसेवा बंद झाली. दोन दिवसांपूर्वीच सोलापूर विकास मंचचने बंद झालेल्या विमानसेवा प्रकरणी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच, मुंबई-सोलापूरसह, नवीन शहरारांना जोडणारी विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज बुधवारी (९ सप्टेंबर) मुंबईत सोलापूर विमानसेवा संदर्भात स्टार एअर कंपनी व राज्यशासन यांच्यात बैठक होणार आहे.

नेत्यांचे फोटो लावून उडवली ‘कागदी विमाने…

आंदोलक कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक कागदी विमानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे छायाचित्र लावले होते. “विमानसेवा त्वरित सुरू करा”, अशी मागणी करीत कागदी विमान हवेत उडवली. सत्ताधार्यांची कार्यपद्धत ही कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचा टोला लगावत जोरदार घोषणाबाजी केली.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, “विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मतांचे राजकारण करण्यासाठी घाईगडबडीत या विमानतळाचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले. विमानसेवेचे गाजर दाखवून भाजपने सत्ता मिळवली. एवढेच नव्हे, तर विमानसेवेच्या नावाखाली सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकरी आणि कामगार कुटुंबांचे संसार उघड्यावर आणले. मात्र प्रत्यक्षात विमानसेवा सतत बंद-चालू ठेवत अखेर ती पूर्णपणे ठप्प केल्याबाबत संताप व्यक्त केला. या आंदोलनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन पवार, विनोद पाटील, धीरज खंदारे, सुशीलकुमार म्हेत्रे, योगेश रणधीरे, विवेक इंगळे, अब्दुल हाफीज मुल्ला, प्रतीक शिंगे, चंद्रकांत नाईक, यासीन शेख, सोपान मिसाळ, अमोल माशाळे, कृष्णा नाईक, दिनेश डोंगरे, आरिफ मकानदार, अभिजीत गायकवाड, अभिषेक पवार, कुणाल राठोड, श्रीनिवास मदरी, विलास राठोड, कृष्णा राठोड, संदेश गायकवाड, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.