​सोलापूर: ‘ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि…’ असा एका सुरात सुरू असलेला मंत्रोच्चार,  मंगलसमयी प्रज्वलित झालेल्या ४ हजार अग्निपात्रांमधून आकाशात झेपावणारा धूर आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेले वातावरण… अशा  विलोभनीय आणि शिस्तबद्ध सोहळ्यात सोलापूरचे श्री आजोबा गणपतीसमोर ऋषिपंचमीचा सूर्योदय तब्बल ४ हजार भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

​श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित या सामूहिक अग्निहोत्र आणि अथर्वशीर्ष पठण सोहळ्याने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

​सूर्यकिरणांसोबत प्रज्वलित झाली ४ हजार अग्निपात्रे

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर या सोहळ्याला प्रारंभ झाला. ‘विश्व फाउंडेशन शिवपुरी’ यांच्या सहकार्याने उपस्थित भाविकांना ४ हजार अग्निपात्रे, गोवऱ्या, तूप आणि अक्षता वाटण्यात आल्या होत्या. मोहन डांगरे, योगेश डांगरे आणि वक्रतुंड औरंगाबादकर यांनी उपस्थित भाविकांना अग्निहोत्राचे आध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर “सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम…” या मंत्रघोषात एकाच वेळी हजारो अग्निपात्रे प्रज्वलित करण्यात आली.

​२१ आवर्तने आणि मंत्रमुग्ध वातावरण

अग्निहोत्रानंतर पंडित वेणुगोपाल जिल्ला पंतुलू यांच्या मुख्य पौरोहित्याखाली श्री गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाला प्रारंभ झाला. महिला आणि पुरुषांनी एकाग्र चित्ताने अथर्वशीर्षाची २१ आवर्तने पूर्ण केली.

या वेळी आत्माराम चिप्पा पंतुलू, सागर यंगलदास पंतुलू, श्रीनिवास जिल्ला पंतुलू आणि संजय ह्यांचाटे यांच्या मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून गेला होता.

​पहाटे चार वाजता आलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती

सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहाटे चार वाजताच उपस्थित राहिलेल्या गौरी हासबे, वैष्णवी हासबे, आरती गंधमल, ऋतुजा कटाप आणि कुंभारीहून आलेल्या सुनंदा चेंडके या भाविकांच्या हस्ते श्री आजोबा गणपतीची महाआरती करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री आजोबा गणपती ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि महिला स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.