सोलापूर : विदर्भातील यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून ५०० किलोमीटरचा प्रवास करून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर तीन वर्षांपूर्वी दाखल झालेला पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ सध्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कारी आणि साकत शिवारात वावरत आहे. काही महिन्यांच्या अज्ञातवासानंतर या वाघाचे अस्तित्व पुन्हा ठळकपणे समोर आल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पर्यटकांमध्ये ‘ताडू’ आणि स्थानिक पातळीवर ‘रामलिंग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चार वर्षांच्या धष्टपुष्ट वाघाने धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर आणि लातूर या पाच जिल्ह्यांच्या सीमेवरील बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये स्वतःचा सुरक्षित अधिवास तयार केला आहे.
बार्शी तालुक्यातील साकत शिवारातील गट क्र. ६५८ मधील शेतकरी किरण पाटील यांना रविवारी रात्री १०:३० वाजता साकत-घाणेगाव रस्त्यावर दुचाकीच्या दिव्याच्या प्रकाशात हा वाघ प्रत्यक्ष दिसला. पाटील यांनी प्रसंगावधान राखत हॉर्न वाजवून सुरक्षित अंतर गाठले. त्यानंतर सोमवारी रात्री कारी येथील श्री शिवाजी प्रशालेच्या पूर्वेकडील जंगल परिसरात वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क्स) आढळले. या नोंदीनंतर वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून सीमावर्ती गावांमध्ये गस्त व जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
टिपेश्वरच्या ‘टी-२२’ या वाघिणीचा हा बछडा २०२२ मध्ये येडशी-रामलिंग अभयारण्यात आला होता. वर्षभर बार्शी-पांगरी भागात वावरल्यानंतर तो दिसेनासा झाला आणि विदर्भात परतल्याचा कयास बांधून विभागाने शोध थांबवला. मात्र, येडशी-येरमाळा (धाराशिव) येथील
तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे यांची बदली बीडमधील आष्टीत झाल्यानंतर, हा वाघही तिथेच पोहोचल्याचे समोर आले. ऑगस्ट महिन्यात देवळाली व ब्रह्मगाव-आंबेवाडीत पाळीव प्राण्यांवरील हल्यानंतर ट्रॅप कॅमेऱ्यातील पट्ट्यांची जुळवाजुळव करून या वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले होते.
डोंगररांगा, उसाची शेती आणि मुबलक भक्ष्य यामुळे हा वाघ आता भूम, परंडा ओलांडून पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या दिशेने सरकला आहे. आता, ऊसतोड हंगाम तोंडावर असताना, वन विभागाने पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांना केवळ ‘बिबट्याचे हल्ले’ ठरवून जबाबदारी झटकण्याऐवजी वाघाच्या या नव्या कॉरिडोअरचे शास्त्रीय ट्रॅकिंग करून शेतकऱ्यांची सुरक्षा निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बार्शी तालुक्यातील कारी, साकत शिवारात गेल्य आठवड्यापसून वाघाचा वावर आहे. त्याच्या पंजाचे ठसे आढळले आहेत. पण, त्याने पाळीव प्राण्यांवर अद्याप हल्ला केलेला नाही. येडशी जंगलाच्या दिशेने तो जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिसरातील गावांमध्ये जनजागृती मोहिम सुरु केली आहे. नागरिकांनी घाबरू न जाता, पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात बांधावे. रात्री अत्यावश्यक असेल तरच खबरदारीच्या उपाययोजनांसह बाहेर पडावे.– शीला बडे, वनपरीक्षेत्र अधिकारी, बार्शी
