सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी देऊन सत्तेचा सोपान गाठणाऱ्या भाजपला आता त्याच नगरसेवकांच्या कथित ‘बेशिस्ती’चा फटका बसू लागला आहे. ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ आणि शिस्तप्रियतेचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील दोन दिवसीय सक्तीच्या निवासी प्रशिक्षण शिबिराकडे सोलापूर महापालिकेतील तब्बल १९ नगरसेवकांनी चक्क पाठ फिरवली. पक्षशिस्तीचा थेट भंग करणाऱ्या या ‘दांडीबहाद्दरां’ची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची तयारी सुरू झाली आहे.
मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत ६ आणि ७ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेतील भाजपच्या २०० नगरसेवकांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासकीय कामकाज, नागरिकांचे प्रश्न सभागृहात कसे मांडावे अन् सोडवायचे, विकासकाम मार्गी लावणे, शासकीय योजनांसह, पक्षाची शिस्त अन् कार्यपद्धतीची ओळख व्हावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजिले होते. त्यास नगरसेवकांनी ५ सप्टेंबरला सायंकाळ पर्यंत उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. ६ व ७ दोन दिवसांचे प्रशिक्षण होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या शिबिरात संघटनात्मक बांधणी, प्रभागातील संवाद आणि महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. मात्र, वरिष्ठ नेते व्यासपीठावरून शिस्तीचे धडे देत असताना सोलापूर मधील नगरसेवकांच्या रिकाम्या खुर्च्याच सभागृहात अधिक चर्चेचा विषय ठरल्या. सोलापूरातील एकूण ९४ नगरसेवकांपैकी शिबिराच्या पहिल्या दिवशी १९, तर दुसऱ्या दिवशी १८ नगरसेवक गैरहजर राहिले. यामध्ये सोलापूरच्या शहर मध्य, दक्षिण आणि उत्तर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील नगरसेवकांचा यात समावेश आहे.
‘आयारामां’नी दिला घरचा आहेर ?….
सोलापूर पालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्यांमध्ये इतर पक्षांतून आलेल्या ५० हून अधिक जणांचा भरणा आहे. निवडणुकीपुरते पक्षात आलेले हे नगरसेवक अद्याप भाजपच्या चौकटीत व कार्यपद्धतीत बसलेले नाहीत, अशी पक्षात अंतर्गत कुजबुज आहे. सभागृहातील गैरवर्तन, बैठकांना गैरहजेरी आणि भाषेचा दर्जा यावरून पक्षांतर्गत नाराजी असतानाच, थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील सक्तीच्या शिबिराकडे पाठ फिरवून या सदस्यांनी पक्षाच्या शिस्तीलाच आव्हान देऊन घरचा आहेर दिल्याची भावना स्थानिक नेतृत्वात आहे.
“पक्षाचे सर्वोच्च नेते उपस्थित असताना सक्तीच्या निवासी शिबिराला गैरहजर राहणे ही गंभीर बाब आहे. शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या त्या संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवला जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रीया पक्षनेते करणार असून तो अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे पाठवून पुढील कारवाई केली जाईल.”-रोहिणी तडवळकर, शहराध्यक्षा, भाजप
“स्वतः मुख्यमंत्री उपस्थित असताना नगरसेवकांनी दांडी मारणे चुकीेचे होते. संबंधितांकडून लेखी म्हणणे मागावण्यात येईल. बैठकीतील गैरहजेरी व संबंधितांचे लेखी उत्तरासह तो सविस्तर अहवाल प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात येईल. – नरेंद्र काळे, भाजप पक्षनेते, सोलापूर महापालिका
