सोलापूर: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनावरून सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूरात झालेल्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून, ‘जनाधार गमावल्यामुळे काँग्रेस जनतेची दिशाभूल करत फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप सोलापूर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या नावाखाली काँग्रेस भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींवर आरोप केला असून  राजकीय सूडबुद्धीने आंदोलनाचा प्रकार काँग्रेसतर्फे सुरु आहे,  भाजप व वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी  पत्रकार परिषद घेत असल्याचे, भाजपच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

‘आक्षेप असल्यास न्यायालयात जावे’ – महापौर कोंड्याल…

काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना महापौर कोंड्याल म्हणाले, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून मतदारयाद्यांचे पुनरीक्षण पारदर्शक पद्धतीने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू आहे. काँग्रेसला या प्रक्रियेबाबत काही शंका असती, तर त्यांनी नियुक्त केलेल्या बूथ लेव्हल एजंट्समार्फत (बीएलए) याद्यांची योग्य पडताळणी करायला हवी होती.” काही राज्यांमध्ये सत्ता मिळताच निवडणूक आयोग योग्य वाटतो आणि पराभव दिसू लागताच ईव्हीएम व ‘व्होट चोरी’चे आरोप करायचे, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याचा टोलाही यावेळी लगावण्यात आला. न्यायालयाचे दरवाजे खुले असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी हे आंदोलन छेडले आहे.  तरुणांची दिशाभूल करून त्यांना रस्त्यावर उतरवले जात असल्याचा दावा महपौर कोंड्याल यांनी केला.

मुख्यमंत्र्यांवरील टीकेला प्रत्युत्तर; सोलापूरच्या विकासावरून प्रश्न…

आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे महापालिकेतील सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी प्रत्युत्तर दिले. “आंदोलन निवडणूक आयोगाविरोधात असताना मुख्यमंत्र्यांवर अकार्यक्षमतेचा आरोप करण्याचा नेमका संबंध काय ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  निवडणूक आयोगाच्या आडून जाणीवपूर्वक भाजप आणि वरिष्ठ नेत्यांवर चिखलफेक केली जात असल्याचे काळे म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या जनतेने शिंदे कुटुंबीयांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली; मात्र शहराच्या विकासासाठी त्यांनी नेमके काय योगदान दिले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

भाजपने आयटी पार्क आणि सोलापूर विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. “विमानतळावरून विमान उडणारच नाही असे दावे करणाऱ्यांना भाजपने प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करून चोख उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे,” असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.

“एकीकडे संविधानाचे पुस्तक हातात धरायचे आणि दुसरीकडे त्याच संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर बेछूट आरोप करायचे, यावरून राहुल गांधी यांच्यातील आत्मविश्वास पूर्णपणे खालावल्याचे स्पष्ट होते,” असा टोला भाजपचा पदाधिकार्यांनी लगावला.  निवडणूक आयोगाच्या आडून भाजप आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शहराध्यक्षा रोहिणी तडळकर आणि स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांनी दिला.