Praniti Shinde Letter : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापुरात काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे या महापालिकेतही एमआयएमने आपले ८ नगरसेवक निवडून आले असून भाजपानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसनेची ताकद येथे कमी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, या अपयशाने कार्यकर्ते खचून जाऊ नयेत, म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांसाठी खास पत्र लिहिलं आहे.

“नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत, हे सत्य आहे. अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्या रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही, याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे. हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही. बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणूकांना आपण सामोरे गेलो होतो. तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो”, असं प्रणित शिंदे म्हणाल्या.

बलाढ्य धनशक्तीचा सामना करण्याकरता चिंतन

त्या पुढे म्हणाल्या, “राजकारणात जय-पराजय हे येत-जात असतात. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते. तुम्ही प्रत्येकाने ज्या जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि न डगमगता काम केलं, ते कुठेही हरलेलं नाही. हा निकाल आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे. लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रश्नांचा सूर, बदलतं सामाजिक वास्तव आपण अधिक खोलवर समजून घ्यायला हवं. या बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवं. सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय असायला हवं.”

दो कदम पीछे हटे हैं

“आज आपण थोडं थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ! कारण, “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने।” तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम!”, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना प्रोत्साहन दिलं आहे.

प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेलं पत्र

सोलापुरात भाजपाचा वरचष्मा

१०२ जागांची असलेल्या सोलापूर महापालिकेत भाजपाला ६३ जागा मिळाल्या असून भाजपा बहुमातापेक्षाही पुढे गेला आहे. खरंतर सोलापुरात भाजपाला रोखण्यासाठी प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), मनसे आणि माकप यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. परंतु, या आघाडीचा सोलापुरात काहीच फायदा झाला नाही. भाजपा ६३, एमआयएम ८, शिवसेना शिंदे १, काँग्रेस १ जागा मिळाली आहे.