सोलापूर:मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या निधीवाटपावरून मंगळवारी पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना साडेसात कोटींचा निधी दिला असताना, इतर आमदारांना केवळ अडीच कोटी रुपये का, असा थेट सवाल करत त्यांनी या दुजाभावावर तीव्र आक्षेप नोंदवला. 

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खासदार धैर्यशील मोहितेपाटील, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पाणंद रस्त्यांच्या निधीवाटपाचा आढावा घेताना आमदार पाटील यांनी प्रशासकीय कारभारातील तफावतीवर बोट ठेवले. एका आमदाराला साडेसात कोटी आणि इतरांना अडीच कोटी, हा निधीवाटपाचा निकष नेमका काय, अशी विचारणा त्यांनी केली. मंजूर कामांपैकी अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत, अशा ठेकेदारांवर कोणती कारवाई केली, असा जाबही त्यांनी विचारला. तसेच, काही रस्त्यांची मंजूर कामे अचानक का रद्द करण्यात आली, याचे स्पष्टीकरण मागितले. रोजगार हमी योजनेतून विहिरींची कामे पूर्ण करूनही शेतकऱ्यांना वेळेत अनुदान का मिळत नाही, या मुद्द्यावरही त्यांनी प्रशासनाला घेरले. 

दरम्यान, १५ व्या वित्त आयोगातून आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी आलेल्या २१ कोटी रुपयांच्या खर्चावरून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. या निधीचा नेमका विनियोग कुठे झाला, किती कामे पूर्ण झाली, याचा सविस्तर ताळेबंद सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर जिल्ह्यात ८७ हजार बांधकाम कामगार नोंदणीकृत असताना एकाही कामगाराला घरकुल योजनेचा लाभ का मिळाला नाही, असा संतप्त सवाल खासदार ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला. योजनेतील एजंटगिरी व बोगस नोंदणी तातडीने थांबवून थेट पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी त्यांनी केली.